जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये हा सामना ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला २०१३ नंतर पहिल्यांदाच आयसीसीची ट्रॉफी मिळवून देण्याचा रोहित शर्माचा प्रयत्न असेल. मात्र या सामन्यापूर्वी आयसीसीने भारताला मोठा धक्का दिला आहे. या सामन्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चेंडूबाबत आयसीसीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो भारतीय संघाला अडचणीत आणणारा ठरू शकतो.
भारतामध्ये कसोटी सामन्यांसाठी एसजी चेंडूंचा वापर केला जातो. तर ऑस्ट्रेलियामध्ये कुकाबुरा कंपनीच्या चेंडूचा वापर केला जातो. मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ड्युक चेंडूने खेळवला जाईल. आयसीसीने त्यामागचं कारणही सांगितलं आहे. ते कारण म्हणजे हा सामना इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. आससीसीमधील सूत्रांनी सांगितलं की, WTC च्या अंतिम सामन्यात ड्युक चेंडूचा वापर केला जाईल. तत्पूर्वी २०२१ मध्येही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनासुद्धा इंग्लंडमध्ये खेळला गेला होता. तसेच त्यावेळीही ड्युक चेंडूचाच वापर करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ड्युक चेंडूने तयारी करण्याबाबत मोठं विधान केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, आम्ही सर्व वेगवान गोलंदाजांकडे ड्युक चेंडू पाठवला आहे. त्यामुळे त्यांना या चेंडूवर सराव करता येईल. त्याने सांगितलं की, २१ मे पर्यंत आयपीएलच्या प्लेऑफमधील ४ संघ निश्चित होतील. त्यानंतर जे खेळाडू मोकळे होतील त्यांना इंग्लंडला पाठवण्यात येईल. त्यामुळे त्यांनी तेथील हवामानानुसार स्व:तला जुळवून घेता येईल. कसोटीसाठी निवडलेल्या संघाचा विचार केल्यास चेतेश्वर पुजारा सध्या इंग्लंडमध्येच आहे. तिथे तो कौंटी क्रिकेट खेळत आहे.
या सामन्यासाठी निवडलेले दोन्ही संघ भारत - रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, के.एस. भरत (यष्टीरक्षक), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव. ऑस्ट्रेलिया - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), स्कॉट बोलँड, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, अॅलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्क हॅरिस, जोस हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोस इंग्लिस, उस्मान ख्वाजा, डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क.