अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीचा पारा चढलेला फार क्वचितच पाहायला मिळाले आहे. त्याच्या याच संयमी स्वभावाने त्याला 'कॅप्टन कूल' हे टोमण नाव पडले. पण, अॅडलेडवर झालेल्या दुसऱ्या वन डे सामन्यात धोनीचा पारा चढला. भारतीय संघाने अॅडलेड सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली. कर्णधार विराट कोहलीचे शतक आणि धोनीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून विजय मिळवला. धोनीने मॅच फिनिशर इनिंग खेळून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पण, या सामन्यात धोनीचा पारा चढलेला पाहायला मिळाला आणि कॅप्टन कूल धोनीच्या तोंडून चक्क शिवी निघाली.
सिडनी वन डे सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात कमबॅक केले. पण, पहिल्या सामन्यातील पराभवाला धोनीची संथ खेळी ( 96 चेंडूंत 51 धावा) कारणीभूत असल्याची टीका झाली. धोनी थकलाय अशाही चर्चा सुरू झाल्या. धोनीने त्याच्या खेळीनेच सर्वांची तोंड बंद केली. ऑस्ट्रेलियाच्या 298 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र, या दोघांना मोठी खेळी करता आली नाही. अंबाती रायुडूही लवकर माघारी परतला. रायुडू बाद झाला त्यावेळी भारताला 20 षटकांत 139 धावा हव्या होत्या.
कर्णधार कोहली आणि माजी कर्णधार धोनी यांनी त्यानंतर संयमी खेळ करताना भारताला विजय मिळवून दिला. 44व्या षटकात कोहली 104 धावांवर माघारी परतला आणि धोनीने जबाबदारीने खेळ केला. त्याने दिनेश कार्तिकसह भारताला विजय मिळवून दिला. धोनीने 54 चेंडूंत नाबाद 55 धावा केल्या आणि त्यात दोन षटकारांचा समावेश होता. ही खेळी साकारताना धोनी संयमी असल्याचे दिसत असला तरी ड्रिंक्स ब्रेकमध्ये त्याचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. त्याने राखीव खेळाडू खलील अहमदला चक्क शिवीच हासडली. पाणी घेऊन आलेला खलील खेळपट्टीवरून पळत गेला आणि धोनी त्याच्यावर भडकला. पाहा व्हिडीओ...