India vs Australia, 3rd Test Day 4 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj) वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही ( Ajinkya Rahane) आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली.
भारतीय क्षेत्ररक्षणांच्या गचाळ क्षेत्ररक्षणानं ऑस्ट्रेलियाला चार जीवदान दिले. त्याचाच फायदा उचलत ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित करून टीम इंडियासमोर ४०७ धावांचं तगडं आव्हान उभं केलं. मार्नस लाबुशेन ( ७३), स्टीव्हन स्मिथ ( ८१) आणि कॅमेरून ग्रीन ( ८४) यांनी दमदार खेळ केला. पण, टी टाईम होण्यापूर्वी सिराजला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि जवळपास १५-२० मिनिटे सामना थांबवण्यात आला.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांना वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला होता. दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी याबाबत तक्रारही केली होती. चौथ्या दिवशीही काही असचे घडले. त्यावेळी मोहम्मद सिराजवर पुन्हा एका चाहत्यानं वर्णद्वेषी टीका केली आणि सिराजनं त्वरित मैदानावरील अम्पायरकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेही भडकला आणि त्यानं त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. रहाणेच्या आक्रमकतेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि सिराजनं सांगितलेल्या स्टँडमधून सहा प्रेक्षकांना बाहेर पाठवण्यात आले.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही टीम इंडियाची माफी मागितली. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की,'अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याचा तपास करत आहे आणि दोषी प्रेक्षकाची ओखळ पटल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याच्यावर आजीवन बंदी घातली जाईल. CCTV फुटेजची पाहणी केली जात आहे.''
Web Title: India vs Australia : Cricket Australia "unreservedly" apologises; Six people removed from the SCG stands after alleged abuse
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.