Join us

India vs Australia : डेव्हिड वॉर्नरची दुखापत गंभीर?; वन डे अन् ट्वेंटी-20 मालिकेतून घेतली माघार!

सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या वन डेतही ऑस्ट्रेलियानं पाहुण्या टीम इंडियावर ५१ धावांनी विजय मिळवला.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 30, 2020 08:58 IST

Open in App

भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या वन डे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) मांडीचे स्नायू ताणले गेले आणि त्यानं त्वरीत हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. कर्णधार अॅरोन फिंचनं तो तिसऱ्या वन डेत खेळणार नसल्याचे संकेत दिलेच होते. पण, तिसऱ्या वन डे पाठोपाठ ट्वेंटी-20 मालिकेतूनही त्यानं माघार घेतली आहे. एवढंच नव्हे तर जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सही ( Pat Cummins) उर्वरित मर्यादित षटकांच्या सामन्यांत खेळणार नाही. वॉर्नरच्या जागी ट्वेंटी-20 संघात डी'आर्सी शॉर्टचा समावेश करण्यात आला आहे.

सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या वन डेतही ऑस्ट्रेलियानं पाहुण्या टीम इंडियावर ५१ धावांनी विजय मिळवला. स्टीव्हन स्मिथची ( १०४) शतकी खेळी अन् फिंच ( ६०), वॉर्नर ( ८३), मार्नस लाबुशेन ( ७०) व ग्लेन मॅक्सवेलच्या ( ६३*) अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ४ बाद ३८९ धावांचा डोंगर उभा केला. भारताविरुद्धची ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात टीम इंडियाला ९ बाद ३३८ धावा करता आल्या. विराट कोहली ( ८९) आणि लोकेश राहुल ( ७६) यांच्याव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना मोठी खेळी करता आली नाही. शिखर धवननं मारलेला फटका अडवताना वॉर्नरला दुखापत झाली आणि तो त्वरित स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये गेला. तो आता रिहॅब सेंटरमध्ये आहे आणि १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेतही त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह आहे.

दरम्यान, कमिन्सला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. ऑगस्ट-सप्टेंबर पासून कमिन्स सातत्यानं खेळत आहे. वॉर्नरच्या जागी शॉर्टचा समावेश करण्यात आले आहे, तर कमिन्सच्या जागी कोणाचे नाव जाहीर झालेले नाही.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नर