India vs Australia : मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासमोर पुनरागमनाचे आव्हान आहे. विराट कोहली पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. रोहित शर्मा सिडनीत दाखल झाला आहे, परंतु क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत नसल्यामुळे तो दुसऱ्या कसोटीचा भाग होणार नाही. अशात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचा कस नक्की लागणार आहे. सर्वकाही भारताच्या विरोधात जात आहे असे वाटत असताना ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवरण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी असल्यानं टीम इंडियासाठी हा मोठा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत ५३ धावांच्या पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक करताना भारतावर ८ विकेट राखून विजय मिळवला. जोश हेझलवूड ( ५ विकेट्स) आणि पॅट कमिन्स ( ४) यांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला. ऑस्ट्रेलियाने ९० धावांचे लक्ष्य सहज पार केले. मालिकेत १-० अशा आघाडीनंतर बॉक्सिंग डे कसोटीतही टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी कांगारू सज्ज झाले आहेत. त्यात पहिल्या सामन्याला मुकलेला डेव्हिड वॉर्नर ( David Warner) दुसऱ्या कसोटीत कमबॅक करणार असल्याची चर्चा होती. वन डे मालिकेत त्याला दुखापत झाली होती. पण, वॉर्नर दुसऱ्या कसोटीसाठीही तंदुरुस्ती होणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे.
पहिल्या कसोटीत वॉर्नरच्या जागी मॅथ्यू वेडला सलामीला खेळवण्यात आले होते, तर कॅमेरून ग्रीननं पदार्पण केलं होतं. विल पुकोवस्की (Will Pucovski) हाही अजून पुर्णपणे बरा झालेला नाही. भारत अ विरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात त्याच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया वेड व जो बर्न्स याच जोडीला सलामीला उतरवण्याची शक्यता आहे. बर्न्सनं पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतकी खेळी करून त्याचे स्थान कायम राखले आहे.
वॉर्नर तंदुरूस्त झाल्यास कोणाचा पत्ता कट होणार?
आपण वेळेत तंदुरूस्त होऊ, असा विश्वास डेव्हिड वॉर्नरनं व्यक्त केला आहे. तसे झाल्यास कॅमेरून ग्रीनला बाकावर बसावे लागेल आणि मॅथ्यू वेड सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल.