India vs Australia, Day & Night Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात आजपासून होत आहे. ॲडिलेड येथे गुलाबी चेंडूने विद्युत प्रकाशझोतात ( Day & Night Test) पहिला सामना खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ सज्ज असून यजमान संघ मात्र दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वपचा काढण्यास आसुसलेला असेल. त्यामुळेच त्यांनी आजच्या सामन्यात तगडा ऑल राऊंडर उतरवला आहे. या खेळाडूनं कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या सराव सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाई करताना शतकी खेळी केली होती.
या सामन्यात कोहलीविरुद्ध स्टीव्ह स्मिथ, चेतेश्वर पुजाराविरुद्ध मार्नस लाबुशेन, जोश हेजलवूडविरुद्ध मोहम्मद शमी, पॅट कमिन्सविरुद्ध जसप्रीत बुमराह अशी चढाओढ अनुभवायला मिळणार आहे. ईशांत शर्माची भारतासाठी तर डेव्हिड वॉर्नरची यजमान संघासाठी अनुपस्थिती लक्षवेधी ठरू शकेल. ऑस्ट्रेलियाला अधिक दिवस-रात्र सामने खेळण्याचा अनुभव असल्याने त्यांना घरच्या मैदानाचा लाभ मिळेल. अशा सामन्यात कुकाबुरा चेंडूचा वापर होत असल्याने दिवसा फलंदाज तर रात्रीच्या प्रकाशात गोलंदाज वर्चस्व गाजवतात, असा अनुभव आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघानं बुधवारी संघ जाहीर केला असला तरी ऑस्ट्रेलियानं त्यांची प्लेईंग इलेव्हन जाहीर केली नव्हती. सामन्यापूर्वी त्यांनी कॅमेरून ग्रीनला ( Cameron Green ) पदार्पणाची कॅप दिली. ग्रीननं सराव सामन्यात नाबाद 125 धावा करताना संघाचा पराभव टाळला होता, शिवाय त्यानं दोन सामन्यांत 3 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या सराव सामन्यात बुमराहनं मारलेला फटका गोलंदाजी करणाऱ्या ग्रीनच्या डोक्यावर आदळला आणि त्याला मॅच सोडावी लागली होती. त्यामुळे त्याच्या खेळण्यावर अनिश्चितता होती. पण, त्यातून तो सावरला आहे.
ऑस्ट्रेलिया संघ - जो बर्न्स, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरून ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड