Sunil Gavaskar on Indian Batters, India vs Australia: भारतीय संघाला मायदेशात लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले. पहिल्या दोन सामन्यांनंतर वानखेडेवरील तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ २५ धावांनी पराभूत झाला. शेवटच्या डावात भारताला केवळ १४७ धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रिषभ पंत वगळता अन्य सर्व फलंदाज पूर्णपणे अयशस्वी ठरले. भारतीय संघाला भारतीय भूमीवर पहिल्यांदाच ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉशची नामुष्की ओढवली गेली. या लाजिरवाण्या पराभवामुळे आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे (WTC Final 2025) तिकीट मिळवणे अधिक कठीण झाले आहे. आगामी ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) विरूद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला ४ सामने जिंकणे अनिवार्य आहे. अशा वेळी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
"पराभव झाला असला तरीही तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा. शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त सराव करा. थ्रोडाऊनचा (जागेवर उभे राहून चेंडू फेकल्यावर फलंदाजी करणे) सराव करताना काही गोष्टीत बदल करा. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमीसारखा फलंदाजीचा सराव करू नका. वेगवान गोलंदाजांना सांगा की २२ यार्ड ऐवजी २० यार्ड अंतरावरून आम्हाला गोलंदाजी करा. जसप्रीत बुमराह सारख्या घातक गोलंदाजांना असे सांगू नका, कारण त्याच्या वेगाने तुम्हाला दुखापत होऊ शकते. पण इतर वेगवान गोलंदाजांना तुम्ही विनंती करू शकता की २० यार्डवरून वेगवान गोलंदाजी करा. याच ऑस्ट्रेलियन भूमीत खेळताना नक्कीच फायदा होईल," असा मोलाचा सल्ला द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सुनील गावसकर यांनी दिला.
"२२ ऐवजी २० यार्डवरून टाकलेल्या गोलंदाजीवर सराव केल्याने चेंडू तुमच्याकडे जास्त वेगाने येईल आणि तुम्हाला ऑस्ट्रेलियात कसे खेळावे लागते याचा अंदाज येईल. फलंदाजांना सध्या तरी मी ऑस्ट्रेलियात खेळण्याच्या दृष्टीने एवढेच सांगू शकतो की, पाच दिवसांची कसोटी खेळत असताना तुम्हाला संयम राखावा लागेल आणि धावा जमवाव्या लागतील. नव्या बॉलची शाईन घालवण्यात तुम्ही यशस्वी झालात की त्यानंतर ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या या बॅटिंगसाठी उत्तम पिचेस आहेत. त्यामुळे संयम राखणे अतिशय आवश्यक आहे," असे अनुभवाचे बोल सुनील गावसकरांनी सांगितले.