मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाने चौथ्या वन डेत दमदार विजय मिळवून मालिका 2-2 अशा बरोबरीत आणली. शिखर धवनच्या 143 धावांची खेळी आणि रोहित शर्माची ( 95) त्याला मिळालेली साथ, याच्या जोरावर भारताने 358 धावांचा डोंगर उभा केला. मात्र, पाहुण्या ऑस्ट्रेलियाने भारताच्या विजयाच्या आशांवर पाणी फिरवले. ऑस्ट्रेलियाने चार विकेट्स राखून 47.5 षटकांतच विजयावर शिक्कामोर्तब केले. 350हून अधिक धावांचा डोंगर उभा करून भारताला विजय आपलाच असे वाटले होते, परंतु ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभवाची चव चाखवली. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज अवघ्या 12 धावांवर माघारी परतले होते. मात्र, उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकोम्ब यांनी विक्रमी 192 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला विजयाचा मार्ग दाखवला. त्यानंतर अॅस्टन टर्नरने जोरदार फटकेबाजी करून ऑस्ट्रेलियाचा विजय पक्का केला. टर्नरने 43 चेंडूंत 84 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीत 5 खणखणीत षटकारांसह 6 चौकारांचा समावेश होता.या निकालामुळे मालिका 2-2 अशी बरोबरीत आली आहे. वन डे क्रिकेट इतिहासात प्रथमच 350हून अधिक धावा करूनही भारताला पराभवाची चव चाखावी लागली. भारताने आतापर्यंत 27 वेळा 350 हून अधिक धावा केल्या आहेत आणि त्यापैकी 24 वेळा त्यांनी प्रथम फलंदाजी करताना हा पल्ला पार केला. ते सर्वच्या सर्व 24 सामने भारताने जिंकले, परंतु प्रथमच त्यांना 350 हून अधिक धावा करूनही हार मानावी लागली. ख्वाजा आणि हँड्सकोम्ब यांनी भारतात यजमानांविरुद्ध तिसऱ्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही नावावर केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाचवा व अंतिम वन डे सामना दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर होणार आहे. बुधवारी होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत.
धोनीच्या अनुपस्थितीत पंतनं संधी गमावली, कार्तिकला खेळवण्याची मागणीया सामन्यात यष्टिरक्षक रिषभ पंतचे गचाळ क्षेत्ररक्षण टीकेचे धनी ठरले. पंतने या सामन्यात सोप्या संधी गमावल्याने नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकले. संघाचा अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन वन डे सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. त्याची उणीव चौथ्या सामन्यात प्रकर्षाने जाणवली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच त्याला वर्ल्ड कपपूर्वी संधी मिळावी म्हणून धोनीला विश्रांती देण्यात आली. पण, धोनीच्या अनुपस्थितीत पंतनं चमकण्याची संधी गमावली. त्याच्या ढिसाळ कामगिरीमुळे दिनेश कार्तिकच्या समावेशाची मागणी जोर धरू लागली आहे.