सिडनी - अत्यंत कठीण परिस्थितीत भारतीय संघाने झुंजार कामगिरी करत सिडनी कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते. सिडनी कसोटी अनिर्णित राहिल्याने चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आता ब्रिस्बेनमध्ये होणारी चौथी कसोटी निर्णायक ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा माइंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. सिडनी कसोटी विसरा, ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला हरवणार, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा फलंदाज मार्नस लाबुशेन याने दिला आहे.लाबुशेन म्हणाला की, भारतीय संघाने सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी ज्या प्रकारे टिकून फलंदाजी केली. त्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू फार काही करू शकले नसते. मात्र आता ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाला हरवून मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक असेल, असेही त्याने सांगितले. सिडनीमध्ये ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी आक्रमण थोपवत सामना अनिर्णित राखला होता.दरम्यान, सिडनी कसोटीत ९१ आणि ७३ धावांची खेळी करणारा लाबुशेन म्हणाला की, सिडनीमध्ये आम्ही अनिर्णित कसोटी सामना खेळलो. मात्र ही कसोटी मालिका आहे आणि ती जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या सामन्याचा निकाल काहीही असो. आता आम्हा ब्रिस्बेनमध्ये जायचं आहे आणि तिथे जिंकायचं आहे. आमच्यासाठी काहीही बदललेलं नाही. आता केवळ भारताला हरवण्यावरच आमचं लक्ष असेल.सिडनी कसोटीत हनुमा विहारी (१६१ चेंडूत नाबाद २३ धावा) आणि रविचंद्रन अश्विन (१२८ चेंडूत नाबाद ३९ धावा) यांनी शेवटच्या दिवसातील शेवटचं संपूर्ण सत्र खेळून काढत सामना वाचवला होता. तत्पूर्वी रिषभ पंत ९७ आणि चेतेश्वर पुजारा ७७ यांनी १४८ धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला होता.दरम्यान, पाचव्या दिवशी खेळपट्टीकडून ऑस्ट्रेलियन संघाला मदतीची अपेक्षा होती. पाचव्या दिवसाची खेळपट्टी साधारणपणे फुटलेली असते. असमान उसळी घेत असते. मात्र अशा परिस्थितीत कुठला संघ १३१ षटके खेळत असेल. तर त्याचे श्रेय त्या संघाला द्यावे लागेल, असेही लाबुशेनने कबुल केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia : सिडनी विसरा, ब्रिस्बेनमध्ये भारताला हरवणार; या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने दिला इशारा
India vs Australia : सिडनी विसरा, ब्रिस्बेनमध्ये भारताला हरवणार; या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने दिला इशारा
India vs Australia Update : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आता ब्रिस्बेनमध्ये होणारी चौथी कसोटी निर्णायक ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन संघाने पुन्हा एकदा माइंड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे.
By बाळकृष्ण परब | Published: January 12, 2021 6:59 PM
ठळक मुद्देभारतीय संघाने सिडनी कसोटीच्या शेवटच्या दिवशी ज्या प्रकारे टिकून फलंदाजी केली. त्या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू फार काही करू शकले नसतेआता ब्रिस्बेन कसोटीत भारतीय संघाला हरवून मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक असेलआमच्यासाठी काहीही बदललेलं नाही. आता केवळ भारताला हरवण्यावरच आमचं लक्ष असेल