सिडनी : भारताच्या शानदार गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध कौशल्याची कसोटी राहणार असून रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या पहिल्या सराव सामन्यात आम्ही त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्यास प्रयत्नशील असू, असे ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रेव्हिस हेडने म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ भारत ‘अ’ संघाविरुद्ध दोन सराव सामने खेळणार आहे. त्यात कसोटी स्पेशालिस्ट खेळाडू मैदानावर उतरतील. भारताविरुद्ध २०१८ च्या कसोटी मालिकेत राष्ट्रीय संघाचा सदस्य राहिलेला हेड पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार आहे. हेड म्हणाला, ‘गेल्या मालिकेतील आठवणी आणि त्यात घडलेल्या बाबींचा विचार केला तर चांगले वाटते. पण, त्यांचे गोलंदाजी आक्रमण शानदार आहे. ते एकमेकांचे समर्थन करतात. नव्या चेंडूला सामोरे गेल्यानंतर मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजाला खेळावे लागते. त्याची लाईन-लेंग्थ शानदार आहे. प्रत्येक गोलंदाजाला सावधगिरीने खेळावे लागते. कसोटी क्रिकेटमध्ये हेच अपेक्षित असते, पण अशा प्रकारच्या गोलंदाजीविरुद्ध (२०१८ ची मालिका) माझा पहिलाच अनुभव होता. मी कसोटी मालिका प्रारंभ होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
सराव सामने महत्त्वाचेहेड म्हणाला, ‘हे दोन्ही (सराव) सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. हे केवळ ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघासाठीच नव्हे तर ऑस्ट्रेलियन संघासाठीही महत्त्वाचे आहेत. आम्ही चांगली कामगिरी करीत भारतावर दबाव आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ’
पहिल्या टी-२० सामन्यातील गोलंदाजीने निराश - स्वेपसन सिडनी : भारतीय संघाविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात यजमान संघाला ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या लढतीत गोलंदाजीतील कामगिरीमुळे निराश असल्याची कबुली ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर मिशेल स्वेपसन याने दिली आहे. स्वेपसनला फिरकीपटू एश्टोन एगरच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. तो म्हणाला, ‘मी पहिले तीन चेंडू चांगले टाकले नाही. चौथ्या चेंडूवर कोहलीचा बळी घेतल्यामुळे दडपण कमी झाले. या अतिउत्साहासह चांगली कामगिरी करण्याचे दडपणही होते. एकूण विचार करता मी माझ्या कामगिरीवर निराश आहे.