India vs Australia : भारतीय संघाला पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. तीन दिवसांहून कमी कालावधीत ऑस्ट्रेलियानं पाहुण्यांना हार मानण्यास भाग पाडले. टीम इंडियाला दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावा करता आल्या. कसोटी क्रिकेटमधील भारताची ही सर्वात निचांक कामगिरी आहे. पाकिस्तानाचा माजी गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhatar) याने टीम इंडियाला ट्रोल करण्याची संधी गमावली नाही. त्यानं सोशल मीडियावरून भारतीय खेळाडूंची फिरकी घेतली.
तिसऱ्या दिवसात पहिल्या तासाभरातच टीम इंडियाचा डाव गडगडला. त्यावर अख्तरनं केलेलं ट्विट तुफान व्हायरल झालं. त्यानं ट्विट केलं की, मी उठलो तेव्हा मला स्कोअर ३६९ असा दिसला, त्यावर मला विश्वास बसला नाही. मी डोळे धुतले आणि पाहिलं तर काय, स्कोअर ३६/९ असा आहे.. त्यावरही विश्वास न बसल्यानं मी पुन्हा झोपी गेलो....
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, टीम इंडियाच्या या कामगिरीनंतर त्यांच्यावर टीका होत असताना आफ्रिदी टीम इंडियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि भारतीय संघ कमबॅक करेल असे मत मांडले. पण, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्यांच्यासमोरील आव्हान अधिक वाढले आहे, असेही तो म्हणाला. आफ्रिदी म्हणाला,''कमिन्स आणि हेझलवूड यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षांनंतर जलदगती गोलंदाजांची टॉप क्लास कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय फलंदाजांच्या फळीत अजूनही कमबॅक करण्याची क्षमता आहे, परंतु विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ते अजून आव्हानात्मक बनले आहे.'