पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तरीही भारतीय संघाला अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याची उपस्थिती संघासाठी फायद्याची ठरणार आहे. 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत पांड्या खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पांड्याने रणजी करंडक स्पर्धेत आपल्या कामगिरीने तंदुरुस्त असल्याचे संकेतही दिले आहेत.
पांड्या सध्या मुंबईत सुरु असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सामन्यात बडोदा संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. दुखापतीमुळे तीन महिन्यांच्या विश्रांतीवर गेलेल्या पांड्याने दमदार पुनरागमन करताना मुंबईविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर आपली छाप पाडली. त्याने 137 चेंडूंत 8 चौकार व एका षटकारासह 73 धावा केल्या, तर त्याने पहिल्या डावात पाच विकेट्स व दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या.
वानखेडेवर सुरू असलेल्या या सामन्यात पांड्याची कामगिरी पाहण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य सरणदीप सिंग हेही उपस्थित होते. पांड्याच्या या कामगिरीने ते प्रभावित झाले आणि त्यांनी दिवसाचा खेळ संपल्यानंतर पांड्याशी चर्चाही केली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे की नाही, हा निर्णय निवड समितीने पांड्यावर सोडला आहे.