India vs Australia, 3rd ODI : वन डे मालिकेत ०-२ अशा पिछाडीनंतर तिसऱ्या सामन्यात इभ्रत वाचवण्याचे आव्हान टीम इंडियासमोर आहे. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल अखेर कर्णधार विराट कोहलीच्या ( Virat Kohli) बाजूने पडला आणि त्यानं त्वरीत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना टीम इंडियाच्या धावगतीवर अंकुश ठेवला होता. पण, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सर्व चित्रच बदललं. विराट कोहली ( Virat Kohli), हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांची अर्धशतकी खेळी, ही टीम इंडियासाठी समाधानकारक बाब ठरली. हार्दिक-रवींद्रने विक्रमी कामगिरी केली.
मयांक अग्रवालला ( Mayank Agarawal) विश्रांती दिल्यानं शिखर धवनसह सलामीला शुबमन गिल आला. टीम इंडियानं आजच्या सामन्यात चार बदल केले. टी नटराजननं वन डे संघात पदार्पण केले, तर शार्दूल ठाकूर व कुलदीप यादव यांनीही अंतिम अकरामध्ये स्थान पटकावले. नवदीप सैनी, मोहम्मद शमी, मयांक आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली आहे. धवन व गिल जोडीला पहिल्या विकेटसाठी २६ धावाच करता आल्या. सीन अॅबोटनं सहाव्या षटकात धवनला ( १६) सहज बाद केले. कव्हरला उभ्या असलेल्या अॅश्टन अॅगरनं सोपा झेल टिपला.
विराट-शुबमन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाला सावरलं. पण, अॅश्टन अॅगरनं शुबमनला ( ३३) पायचीत करून ही भागीदारी संपुष्टात आणली. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस ( १९) झेलबाद झाला. लोकेश राहुलनेही निराश केलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टीच्चून मारा करताना भारताच्या धावगतीवर लगाम लावताना फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडले. राहुल ५ धावांवर पायचीत झाला. विराट हा एकमेव आशास्थान टीम इंडियासाठी मैदानावर होता. पण, जोश हेझलवूडनं त्याची विकेट काढली. विराट ७८ चेंडूंत ५ चौकारासह ६३ धावांवर माघारी परतला.
हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकला तोडीसतोड साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९९ मध्ये सदगोपन रमेश आणि रॉबिन सिंग यांनी १२३ धावांची भागीदारी केली होती. तो विक्रम आज हार्दिक-रवींद्र जोडीनं तोडला. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी १५० धावांची भागीदारी केली.