Join us  

India vs Australia : भारताला धक्का, हार्दिक पांड्याची मालिकेतून माघार

India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेतून कर्णधार विराट कोहली भारतीय संघात कमबॅक करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 2:58 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱ्या ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेतून कर्णधार विराट कोहली भारतीय संघात कमबॅक करणार आहे. त्यामुळे कोहलीची फटकेबाजी पाहण्यासाठी आतुरलेल्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत आहे. पण, ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला जबर धक्का बसला आहे. भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे.

दोन ट्वेंटी-20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले होते. मात्र, पाठीच्या दुखण्यानं डोकं वर काढल्यानं त्याला या मालिकेतूनच माघार घ्यावी लागली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी त्याबाबतची घोषणा केली. बीसीसीआयनं सुरुवातीला जाहीर केलेल्या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे चाहत्यांनी नाराजी प्रकट केली होती, परंतु पांड्याच्या माघारीमुळे जडेजाला संधी मिळाली आहे. पण, जडेजाचा केवळ वन डे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला ट्वेंटी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरु होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन डे  मालिकेत व दोन कसोटी सामन्यांत जडेजाला संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत त्याने केवळ दोन विकेट घेतल्या, तर 8 धावा केल्या. कसोटीत मात्र त्याने दोन सामन्यांत 7 विकेट घेतल्या होत्या. आता वर्ल्ड कप संघात स्थान मिळवण्याची त्याला अखेरची संधी आहे.  

टॅग्स :हार्दिक पांड्याभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआयरवींद्र जडेजा