ठळक मुद्देसराव सामन्याचा बराच काळ पावसामुळे वायाभारताच्या सराव सामन्यात पावसाचा खोविराट कोहली अन् सहकाऱ्यांचा वेळेचा सदुपयोग
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाच्या सराव सामन्यातील पहिल्या तीन-चार तासांचा खेळ पावसाने वाया घालवला. भारतीय प्रमाणवेळेनुसार क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धचा सराव सामना पहाटे 5.30 वाजता सुरू होणार होता, परंतु पावसाच्या हजेरीने सामना सुरुच झाला नाही. कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करण्यापूर्वी भारतासाठी हा सराव सामना महत्त्वाचा होता. त्यामुळे पावसाच्या आगमनाने खेळ वाया जात असल्याने भारतीय खेळाडू निराश झाले. मात्र, त्यांनी या वेळेचा सदुपयोग केला. कर्णधार विराट कोहलीनं पावसाच्या व्यत्ययातही शाळा भरवली आणि सहकाऱ्यांकडून चांगलीच मेहनत करून घेतली. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेला.
सकाळपासून सुरु असलेला पाऊस विश्रांती घेण्याच्या मुडमध्ये नव्हता. त्यामुळे खेळाडूंना ड्रेसिंग रुमबाहेर पडताच येत नव्हते. त्यामुळे कोहली सहकाऱ्यांना जिममध्ये व्यायाम करण्यासाठी घेऊन गेला. त्यांनी बराच काळ जिममध्ये घालवला. भारताने ट्वेंटी-20 मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला 1-1 अशा बरोबरीत रोखले. ट्वेंटी-20 मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांतही पावसाने व्यत्यय आणला. दुसरा सामना तर पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताची सलग सात ट्वेंटी-20 मालिका जिंकण्याच्या घोडदौडीला ब्रेक लागला. कसोटी मालिकेत भारतीय संघ विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि स्टीव्हन स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत भारताला ही मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. त्यासाठी सराव सामन्यातून लय मिळवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न आहे, परंतु पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोहलीसह गोलंदाज इशांत शर्मा आणि सलामीवीर मुरली विजय यांनी जिममध्ये घाम गाळला. हे दोघेही इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघासोबत होते. भारताला 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका (1-2) आणि इंग्लंड (1-4) दौऱ्यावर कसोटीत पराभव पत्करावा लागलेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम संघ मैदानावर उतरवण्यासाठी कोहली प्रयत्नशील आहे. त्यामुळे सराव सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीवर पुढील वाटचाल अवलंबून आहे.
सराव सामन्यासाठीचे संघभारतः लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा,
विराट कोहली ( कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्वीन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, रोहित शर्मा, मुरली विजय, हनुमा विहारी, पार्थिव पटेल, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा
क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादशः डी अॅर्सी शॉर्ट, मॅक्स ब्रायंट, सॅम व्हाईटमन (कर्णधार), जॅक कार्डर, हॅरी निलसन, परम उप्पल, जॉनथन मेर्लो, जॅक्सन कोलमन, हॅरी कोनवेय, डॅनियल फॅलिन्स, डेव्हिड ग्रांट, अॅरोन हार्डी.
Web Title: India vs Australia : Here's what Virat Kohli and Co did on rain-hit Day 1 of practice Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.