मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले आहे. वॉर्नरने या सामन्यात एक पराक्रम करत देशाला विजय मिळवून देण्याता मोलाचा वाटा उचलला आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. या दोघांनी या सामन्यात विश्वविक्रम रचला आणि संघाला विजयही मिळवून दिला. वॉर्नर आणि फिंच या जोडीने भारताविरुद्ध अभेद्य २५८ धावांची भागीदारी रचली. आतापर्यंत वानखेडेवर भारताविरुद्ध झालेली ही सर्वाधिक भागीदारी आहे.
वॉर्नरने यावेळी चौकारासह आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील १८वे शतक ठरले. हे शतक साजरे करतना वॉर्नरने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद पाच हजार धावा करण्याचा पराक्रम वॉर्नरने केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांच्या नावावर होता.