Join us  

India vs Australia : मी तर कुलदीप यादवला घाबरतो, सांगतोय शतकवीर उस्मान ख्वाजा

मला कुलदीप यादवची भिती वाटत होती, असे दस्तुरखुद्द ख्वाजाने सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 4:02 PM

Open in App

रांची, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताविरुद्धचा तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला तो सलामीवीर उस्मान ख्वाजा. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 313 धावा केल्या होत्या, यामध्ये मोलाचा वाटा ख्वाजाच्या 104 धावांचा होता. पण या खेळीदरम्यान मला कुलदीप यादवची भिती वाटत होती, असे दस्तुरखुद्द ख्वाजाने सांगितले आहे.

ख्वाजाचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक ठरले. याबाबत ख्वाजा म्हणाला की, " कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना तुम्हाला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. यापूर्वी मी एकदा कसोटी सामन्यात 98 धावांवर बाद झालो होतो. त्यावेळी मला शतकाने हुलकावणी दिली होती. पण भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मात्र मला पहिले शतक साजरे करता आले. पहिल्या शतकाचा आनंद अवर्णनीय असतो."

कुलदीपबद्दल ख्वाजा म्हणाला की, " तिसऱ्या सामन्यात भारताचा फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीचा सामना करणे सोपे नव्हते. त्यामुळे कुलदीपच्या चेंडूचा जास्त सामना करायचा नाही, हे मी ठरवले होते. त्यामुळे कुलदीपची गोलंदाजी सुरु असताना मी एकेरी धाव घ्यायचो. जेणेकरून आरोन फिंच कुलदीपचे जास्त चेंडू खेळू शकेल."

विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 313 धावा केल्या आणि या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे तीन तेरा वाजले. कोहलीने 123 धावांची खेळी साकारली खरी, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला झटपट तीन धक्के बसले. त्यानंतर कोहली आणि महेंद्रिसिंग धोनी यांनी संघाला स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. पण मोठा फटका मारण्याच्या नादात धोनी 26 धावांवर बाद झाला. धोनी बाद झाल्यावर कोहलीने केदार जाधवबरोबर डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण केदार बाद झाल्याने हा प्रयत्नही अपयशी ठरला. कोहलीने 16 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 123 धावा केल्या. कोहलीचे हे 41वे शतक ठरले.

टॅग्स :कुलदीप यादवभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया