ICC Women's T20 World Cup, Final: जागतिक महिला दिनी वर्ल्ड कप उंचावून इतिहास घडवण्याची संधी टीम इंडियानं गमावली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा हुकुमी पत्ता ( फिरकी गोलंदाजी) अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी शतकी सलामी करताना टीम इंडियाच्या गोलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. हिली आणि मूनी या दोघींनी टीम इंडियानं जीवदान दिले आणि ती चूक महागात पडली. फलंदांजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर ऑसी गोलंदाजांनी व क्षेत्ररक्षकांनी आपली भूमिका चोख बजावली. ऑसींनी उभे केलेल्या आव्हानाचे दडपण टीम इंडियाच्या खेळाडूंना पेलवलं नाही आणि त्यांनी हार मानली. ऑस्ट्रेलियानं पाचव्यांदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारताना भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अॅलिसा हिली आणि बेथ मूनी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना हतबल केले. हिलीच्या ७५ धावांच्या वादळी खेळीनंतर मूनीनं फटकेबाजी केली. हिलीनं ३० चेंडूंत अर्धशतक झळकावले. तिचे हे ट्वेंटी-२०तील १२ वे अर्धशतक ठरले. या कामगिरीसह हिलीनं वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. हिलीचे हे अर्धशतक आयसीसी स्पर्धेतील पुरुष ( वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप ) आणि महिला ( वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप) सर्वात जलद अर्धशतक ठरले. राधा यादवने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. तिनं हिलीला वेदा कृष्णमुर्तीकरवी झेलबाद केले. हिलीनं ३९ चेंडूंत ७ चौकार व ५ षटकार खेचून ७५ धावा केल्या.
हिली आणि मूनी यांनी ११५ धावांची भागीदारी केली. महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २०१६च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजच्या स्टेफनी टेलर आणि हिली मॅथ्यू यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२० धावा चोपल्या होत्या. बेथ मूनीनंही ४० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मूनीनं ऑसींना मोठी धावसंख्या उभारून दिली होती. ऑस्ट्रेलियानं ४ बाद १८४ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी १८५ धावांचे आव्हान आहे. मूनी ७८ धावांवर नाबार राहिली. मूनीनं ५४ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ७८ धावा केल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला तिसऱ्याच चेंडूवर मोठा धक्का बसला. स्पर्धेत आतापर्यंत तुफानी खेळी करणाऱ्या शेफाली वर्माला दडपणात अपयश आले. मीगन स्कटच्या चेंडूवर चिकी फटका मारण्याचा तिचा बेत चुकला आणि यष्टिरक्षक हिलीनं सुरेख झेल टिपला. त्यानंतर आलेली तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली. जेमिमा रॉड्रीग्ज ( ०) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर ( ४ ) यांनाही जेस जॉनासेननं बाद केले. स्मृती मानधनाचे अपयशाचे सत्र अंतिम सामन्यातही कायम राहिले. ती ११ धावा करून सोफी मोलिनेक्सच्या गोलंदाजीवर बाद झाली. वेदा कृष्णमुर्ती आणि दीप्ती शर्मा यांनी काही काळ खेळपट्टीवर खिंड लढवली. परंतु १२ व्या षटकात वेदा झेलबाद झाली. भारताची अखेरच्या आशाही मावळल्या. स्कटनं १८ व्या षटकात टीम इंडियाच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. टीम इंडिया ९९ धावांवर ऑल आऊट झाली. ऑस्ट्रेलियानं ८५ धावांनी सामना जिंकला. ऑसींनी ८६ हजार १७४ प्रेक्षकांच्या साक्षींनं पाचव्यांदा वर्ल्ड कप उंचावला.
विजेत्या संघावर प्रथमच पैशांचा धो धो पाऊस पडणार, जाणून घ्या कोणाला किती मिळणार
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने रचला विक्रम, दिग्गजांच्या पंक्तित स्थान
अॅलिसा हिलीनं धू धू धुतलं, पुरुष फलंदाजालाही न जमलेला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला
'या' दोन मोठ्या चुका टीम इंडियाला महागात पडल्या, अन्यथा....
ऑसी महिला संघाच्या धुलाईने जाग्या केल्या 'त्या' पराभवाच्या कटू आठवणी