India vs Australia, 3rd ODI : भारतीय संघानं तिसऱ्या वन डे सामन्यात विजय मिळवून इभ्रत वाचवली. हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी १५० धावांची नाबाद भागीदारी करताना संघाला ३०२ धावांचा डोंगर उभा करून दिला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी दमदार खेळ करताना टीम इंडियाचे टेंशन वाढवले होते. पण, जसप्रीत बुमराहनं मोक्याच्या क्षणी मॅक्सवेलचा त्रिफळा उडवला आणि सामन्याला कलाटणी दिली. पराभवानंतरही ऑस्ट्रेलियानं ही मालिका २-१ अशी जिंकली.
टीम इंडियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा अपयशाचा पाढा वाचला. पण, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी दमदार खेळताना टीम इंडियाला मोठा पल्ला गाठून दिला. ५ बाद १५२ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी पांड्या-जडेजा जोडी धावून आली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद १५० धावांची विक्रमी भागीदारी केली. विराट ७८ चेंडूंत ५ चौकारासह ६३ धावांवर माघारी परतला.
हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकला तोडीसतोड साथ दिली. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.
डेव्हिड वॉर्नरची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियाला जाणवली. मार्नस लाबुशेनला कर्णधार अॅरोन फिंचला सलामीला साजेशी साथ देता आली नाही. टीम इंडियाकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या टी नटराजननं ऑसींना पहिला धक्का दिला. लाबुशेन ७ धावांवर त्रिफळाचीत झाला. स्टीव्ह स्मिथ ( ७) शार्दूल ठाकूरचा शिकार बनला. ठाकूरनं मॉईजेस हेन्रीक्स (२२) बाद करून ऑसींना आणखी एक धक्का दिला. पदार्पणवीर कॅमेरून ग्रीन ( २१) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचाही निम्मा संघ १५८ धावांवर तंबूत परतला होता. अॅलेक्स केरी आणि ग्लेन मॅस्कवेल यांनी ताबडतोड अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाची चिंता वाढवली होती. पण, ३८व्या षटकात केरी ( ३८) धावबाद झाला.