ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघात एका सदस्याची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ट्वेंटी-20 संघात समावेश नाही. भारतीय संघ प्रथमच धोनीशिवाय ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-20 सामन्यांत सामना करणार आहे. धोनीने इंग्लंड दौऱ्यावर अखेरचा ट्वेंटी-20 सामना खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 सामन्यांत धोनीला एकदाच फलंदाजी करण्याची संधी मिळाली, त्यात त्याने नाबाद 32 धावा केल्या होत्या.
धोनी मागील काही सामन्यांत धावा करताना धडपडतोय, परंतु यष्टिमागे त्याच्या कामगिरीला अजूनही तोड नाही. पण, फलंदाजीतील अपयशामुळे त्याला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला विश्रांतीच्या नावाखाली संघाबाहेर ठेवण्यात आले. मात्र, त्याचे संघात नसणे भारतासाठी धोकादायक ठरू शकते. त्याच्या जागी रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे, तर अनुभवी दिनेश कार्तिक अतिरिक्त फलंदाज म्हणून संघासोबत आहे.
विंडीजविरुद्धच्या मालिकेत कार्तिकने तिन्ही सामन्यात यष्टिरक्षण केले. ऑस्ट्रेलियात मात्र पंतला ही जबाबदारी दिली जाऊ शकते. पंत फलंदाजीतही आपली छाप पाडण्यात यशस्वी झाला आहे, परंतु यष्टिमागे त्याने निराश केले आहे. त्यामुळे धोनीची उणीव नक्की जाणवेल. यष्टिमागील चपळाईसह धोनीचे मार्गदर्शन संघाला मिळणार नाही. अनेकदा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली धोनीचा सल्ला नक्की घेतो. यंदा त्याला तो मिळणार नाही. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना यष्टिमागून गोलंदाजी करण्याचा सल्लाही धोनीकडून मिळालेला आहे.