- अयाज मेमन(कन्सल्टिंग एडिटर )
एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारताने शानदार आणि प्रभावी पुनरागमन केले. तिसरा सामना जिंकण्याने भारतासमोरचे अनेक प्रश्न सुटले आहेत. यामुळे प्रथम टी २० आंतरराष्ट्रीय सामना जिंकण्याचा आत्मविश्वासदेखील भारतीय संघात निर्माण झाला.जडेजाचा पर्याय म्हणून संघात आलेल्या चहलने तीन बळी घेतले. त्यामुळे जडेजाची फलंदाजी आणि चहलची गोलंदाजी नसती तर भारत कधीही सामना जिंकू शकला नसता. बहुधा त्यामुळेच सामनावीराचा पुरस्कार दोघांमध्ये वाटला जाऊ शकला असता.जडेजाच्या हेल्मेटला चेंडू लागल्यानंतर तो फलंदाजी कसा करत होता. तसेच त्याचा पर्याय म्हणून चहलला कसे स्थान मिळाले यावरून ऑस्ट्रेलियाचा संघ नाराज होता.हेल्मेटला लागल्यानंतर जडेजाने फलंदाजी सुरू ठेवल्याने हे खेळाडूच्या बदलीचे प्रकरण होते का? दुसरे, या नियमात जडेजासाठी चहल बदलण्याची शक्यता होती का? या विषयावर वादविवाद नक्कीच काही काळ सुरू राहतील. तरीही रेफरीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक आहे हे स्पष्ट आहे.आता परिस्थिती भारताच्या बाजूने आहे. सुरुवातीचे दोन एकदिवसीय सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. त्यांनी भारताला संधीच दिली नाही. मात्र आता भारताकडे टी२० मालिका जिंकण्याची संधी आहे.ऑस्ट्रेलियाच्या संघाला सतत सराव आणि खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी इंग्लंडविरोधात मालिका खेळली, सोबतच स्थानिक शेफिल्ड शिल्ड स्पर्धा आणि आयपीएलमध्ये देखील ते खेळले मात्र भारतीय संघाला आयपीएलशिवाय इतर कुठेही खेळण्याची संधी मिळाली नाही.तसेच स्थानिक खेळाडू असल्याने त्यांना बायोबबलमध्ये राहणे देखील सोयीचे होते. त्यामुळे दोन सामन्यानंतर भारताने फिरवलेली बाजी ही नक्कीच दखल घेण्यासारखी आहे.मात्र आता मुद्दा आहे तो खेळाडूंच्या सरावाचा आणि त्यांचा फॉर्म कसा टिकून राहील याचा. आता जडेजा उर्वरीत दोन टी२० सामने खेळू शकणार नाही. ही एक समस्या आहे तो उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. चहल त्याला पर्याय ठरु शकेल का, आणि जर असे झाले तर ते भारतीय फलंदाजीला कमकुवत करेल.