India vs Australia : पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी घेऊन फ्रंट सीटवर बसलेल्या टीम इंडियाला एका तासात ऑसी गोलंदाजांनी थेट उचलून मागच्या बाकावर फेकले. भारताचा दुसरा डाव तिसऱ्या दिवशी तासात गडगडला. टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियानं ९० धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून पार केले. ऑस्ट्रेलियानं मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या निराशाजनक कामगिरीवर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं त्याचं मत मांडलं.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळले. मयांक अग्रवाल वगळता भारताचा एकही फलंदाज ५० मिनिटांपेक्षा अधिक काळ खेळपट्टीवर टिकला नाही. अजिंक्य रहाणे फक्त ४ मिनिटांत तंबूत परतला. पृथ्वी शॉ ( १५ मिनिटे), चेतेश्वर पुजारा ( १७), विराट कोहली ( १८), हनुमा विहारी ( ४४) आणि वृद्धीमान सहा ( २७) यांनाही ऑसी गोलंदाजांनी फार काळ खेळपट्टीवर जम बसवू दिला नाही. भारताच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही करता आला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघावर ही नामुष्की आली.
या कामगिरीनंतर त्यांच्यावर टीका होत असताना आफ्रिदी टीम इंडियाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि भारतीय संघ कमबॅक करेल असे मत मांडले. पण, विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्यांच्यासमोरील आव्हान अधिक वाढले आहे, असेही तो म्हणाला. आफ्रिदी म्हणाला,''कमिन्स आणि हेझलवूड यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्याच वर्षांनंतर जलदगती गोलंदाजांची टॉप क्लास कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय फलंदाजांच्या फळीत अजूनही कमबॅक करण्याची क्षमता आहे, परंतु विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ते अजून आव्हानात्मक बनले आहे.''