अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी 2018 हे वर्ष परदेश दौऱ्यांच्या बाबतीत तितकेसे चांगले राहिले नाही. भारतीय संघाने परदेश दौऱ्यावर सलग दोन कसोटी मालिका गमावल्या, परंतु तरीही त्यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. आसपास कोणताही संघ नसल्याने भारताला अव्वल स्थान कायम राखता आले, परंतु ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर ही क्रमवारी तशीच राहिल याची खात्री नाही. मालिकेतील अपयश भारताचे अव्वल स्थान हिरावून घेऊ शकते आणि ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड हे अव्वल स्थानावर कब्जा करू शकतो.
भारताला अव्वल स्थान टिकवायचे असल्यास ऑस्ट्रेलियाकडून 4-0 असा पराभव टाळावा लागेल. तसे झाल्यास ऑस्ट्रेलिया अव्वल क्रम पटकावेल आणि भारताला आठ गुण गमवावे लागतील. निकाल 3-1 असा राहिला, तर भारत 111 गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिल, तर ऑस्ट्रेलिया 107 गुणांसह दुसऱ्या स्थानावर येईल. त्याशिवाय भारताला न्यूझीलंडकडूनही धोका आहे. किवींनी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असे विजय मिळवले आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2-0 अशी हार मानली तरी त्यांचे अव्वल स्थान जाईल.