मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हीड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी वैयक्तिक शतकी खेळी करून ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पण भारताला या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-० असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागेल, असा बाऊन्सर एका माजी क्रिकेटपटूने टाकला आहे.
नाणेफेकीचा कौल बाजूने लागताच ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लोकेश राहुल व शिखर धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करताना संघाचा डाव सावरला. राहुल ( 47) माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडला. धवन ( 74), विराट ( 16) आणि श्रेयस अय्यर ( 4) हे झटपट माघारी परतले. रिषभ पंत ( 28) आणि रवींद्र जडेजा ( 25) यांनी सावध खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी चतुराईनं भारताच्या धावांवर लगाम लावला. या जोडीनं नाबाद 258 धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडले. वॉर्नरने 112 चेंडूंत 17 चौकार व 3 षटकारांसह 128, तर फिंचने 114 चेंडूंत 13 चौकार व 2 षटकारांसह 110 धावा केल्या.
या पराभवानंतर भारतीय संघावर जोरदार टीका होत आहे. बऱ्याच वर्षांनंतर भारताला असा दहा विकेट्सने मोठा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियाचे मनोबल कमालीचे उंचावले असून ते आता मालिका जिंकतील, अशी भावना काही चाहत्यांच्या मनात आहे.
याबाबत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर म्हणाला की, " भारतासाठी हा पराभव डोळे उघडणारा ठरेल. कारण भारताच्या गोलंदाजीची ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पिसे काढली. त्यामुळे जर ऑस्ट्रेलिया याच पद्धतीने खेळत राहिली तर भारताला ही मालिका ३-० अशा फारकाने गमवावी लागेल. जर ही गोष्ट घडली तर भारतासाठी सर्वात लाजीरवाणी बाब असेल."
भारताला पहिल्यांदा दहा विकेट्ने पराभूत होण्याची वेळ १९८१ साली आली होती. त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाने भारताला या मोठ्या फरकाने पराभूत केले होते. भारताने न्यूझीलंडपुढे ११३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने एकही फलंदाज गमावला नव्हता.
वेस्ट इंडिजने १९९७ साली बर्मिंगहम येथे भारतावर मोठा विजय मिळवला होता. भारताने वेस्ट इंडिजपुढे २०० धावांचे आव्हान ठेवले होते. वेस्ट इंडिजने एकही फलंदाज न गमावता हे आव्हान पार केले होते. त्यानंतर २००० साली शारजाह येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या लढतीतही हीच गोष्ट पाहायला मिळाली होती. भारताने आफ्रिकेपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळीही भारतावर दहा विकेट्स राखून विजय मिळवला गेला. आफ्रिकेने यानंतर कोलकाता येथे २००५ साली भारतावर दहा विकेट्स राखून विजय मिळवला होता. यावेळी भारताने त्यांचापुढे १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर आज झालेल्या सामन्यात मानहानीकारक पराभव भारताच्या पदरी पडला.