मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : एकदिवसीय मालिकेनंतर आता महेंद्रसिंग धोनीवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. धोनीची स्तुती करण्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीही मागे नाही. धोनीवर स्तुती करताना, तो भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ आहे, असे कोहलीने म्हटले आहे.
महेंद्रसिंग धोनीमधला मिडास टच पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत जिंकला. धोनीने तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावले आणि दोनदा विजयाचा शिल्पकार ठरला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने नाबाद 87 धावांची खेळी साकारली. धोनीच्या या खेळीच्या जोरावर भारताचा विजय सुकर झाला. धोनीमधला फिनिशर पुन्हा एकदा भारताला या मालिकेत गवसला.
धोनीबद्दल विराट म्हणाला की, " धोनीसारखे खेळाडू फार कमी असतात. धोनी ज्यापद्धतीने एखादी परिस्थिती हाताळतो, ते पाहणे अविस्मरणीय असते. कारण त्याला प्रत्येक परिस्थिमधून कसे बाहेर पडायचे हे माहिती असते. धोनी आताही दमदार खेळ करत आहे. माझ्यामते जर कोणता खेळाडू भारतीय संघाशी सर्वात एकनिष्ठ असेल तर तो धोनीच असू शकतो. "
तिसरा सामना जिंकल्यावर धोनीशी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हस्तांदोन करत होते. त्यावेळी पंचही धोनीजवळ आल्यावर धोनीने चेंडूची मागणी केली आणि पंचांनीही धोनीला चेंडू दिला. त्यानंतर धोनी जेव्हा भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करत होता, तेव्हा धोनीच्या हातात चेंडू असल्याचे साऱ्यांनीच पाहिले. त्यानंतर धोनीने हा चेंडू प्रशिक्षक संजय बांगर यांना दिला आणि त्यांना म्हणाला, " हा चेंडू तुमच्याजवळ ठेवा. नाहीतर पुन्हा माझ्या निवृत्तीची चर्चा सुरु होईल. "