Join us  

India vs Australia : डे-नाईट कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर, पंतसह हा दिग्गज फलंदाज संघाबाहेर

Border-Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठी भारताच अंतिम ११ जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

By बाळकृष्ण परब | Published: December 16, 2020 3:15 PM

Open in App

अॅडलेड - ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारपासून सुरू होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठी भारताच अंतिम ११ जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. सराव सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या यष्टीरक्षक रिषभ पंतला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या लोकेश राहुललाही अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही. मात्र सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला सामना यावेळी दिवस-रात्र पद्धतीने खेळवला जाणार आहे. दरम्यान, मालिकेतील या सामन्यात संघाचं नेतृत्व केल्यानंतर विराट कोहली पितृत्व रजेवर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंची घोषणा संघव्यवस्थापनाकडून आज करण्यात आली आहे.

डे-नाईट कसोटीसाठी सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांच्यावर विश्वास दर्शवण्यात आला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीची धुरा सांभाळतील. त्यांच्याबरोबर हनुमा विहारी संघात असेल. बऱ्याच चर्चेनंतर यष्टीरक्षणासाठी अखेर वृद्धिमान साहा याच्यावर विश्वास दर्शवण्यात आला आहे. फिरकीची धुरा रविचंद्रन अश्विनच्या खांद्यावर असेल. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसोबत उमेश यादव वेगवान माऱ्याची जबाबदारी सांभाळेल.

पहिल्या कसोटीसाठीचा भारतीय संघ

पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघ