ठळक मुद्दे6 डिसेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे खेळवण्यात येणारमुरली विजय, लोकेश राहुल व पृथ्वी शॉ यांच्यात सलामीसाठी शर्यत
अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने ट्वेंटी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला 1-1 असे बरोबरीत रोखले आहे. मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर दोन्ही संघांनी आपला मोर्चा कसोटीकडे वळवला आहे. 6 डिसेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, भारताला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये कोणाला संधी द्यायची, सलामीची जोडी कोणती, अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधावी लागणार आहेत. भारताने माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सलामीचा प्रश्न सोडवला आहे.
अॅडलेड येथे 6 डिसेंबरला पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. तत्पूर्वी भारतीय संघ 28 नोव्हेंबरपासून चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. या सराव सामन्यातून भारतीय संघ खेळाडूंची चाचपणी करणार आहे. कसोटी मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात मुरली विजयने पुनरागमन केले आहे. विजयला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून अर्ध्यातून वगळण्यात आले होते, तर वेस्ट इंडिजविरुद्घच्या मालिकेतही त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्याच्यासह युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि लोकेश राहुल सलामीच्या शर्यतीत आहेत.
इंग्लंड दौऱ्यात विजयला दोन सामन्यांत केवळ 26 धावा करता आल्या होत्या. लॉर्ड्स कसोटीत तो दोन्ही डावांत भोपळाही फोडू शकला नाही. त्यामुळे त्याला संघातून डच्चू देण्यात आला. मात्र, त्याने एसेस्क क्लबकडून कौंटी क्रिकेटमध्ये सलग तीन अर्धशतकं आणि एक शतक झळकावले. राहुलचीही कामगिरी फार चांगली झालेली नाही. त्याने 18 डावांमध्ये 24.70 च्या सरासरीने 420 धावा केल्या आहेत. त्यात ओव्हल कसोटीतील शतकाचा समावेश आहे. मात्र, विंडीजविरुद्ध तो पुन्हा अपयशी ठरला. पृथ्वीने विंडीजविरुद्ध कसोटीत पदार्पण करताना शतकी खेळी केली. त्याची तुलना सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्याशी करण्यात येऊ लागली आहे.
विजय, राहुल व पृथ्वी या तिघांपैकी कोणाला संधी द्यावी या प्रश्नावर गावस्कर यांनी राहुलच्या नावावर काट मारली. ते म्हणाले,'' पृथ्वीला पहिल्या कसोटीत संधी मिळायला हवी. त्याने न्यूझीलंडमध्येच नाही, तर मायदेशात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्या तुलनेत राहुलची कामगिरी सुमार झाली आहे. ट्वेंटी-20 मालिकेत तो चांगला खेळला असता, तरी त्याच्या नावाचा विचार करण्यास हरकत नव्हती. पण, त्याला आणखी किती संधी देणार? त्यामुळे विजय व पृथ्वी ही सलामीची जोडी योग्य आहे.''