India vs Australia, 4th Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा यांनी दुखापतीमुळे माघार घेतली. त्यात पहिल्या कसोटीनंतर विराट कोहली ( Virat Kohli) पत्नीच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतला. कसोटी मालिका सुरू झाल्यापासून मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व हनुमा विहारी ही अशी दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका १-१अशा बरोबरीत असताना ब्रिस्बेन कसोटी मालिकेचा निकाल ठरवणारी आहे. अशात संघ व्यवस्थापनानं बुमराहला ५० टक्के फिट असतानाही चौथ्या कसोटीत खेळवण्याचा घाट घातल्याचे वृत्त समोर येत आहे.
तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी बुमराह प्राथमिक उपचारासाठी मैदानाबाहेर गेला होता. त्यानं टीम इंडियाच्या एकूण ८७ षटकांमध्ये २५ षटकं फेकली. इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव हे अनुभवी गोलंदाज संघात नसताना बुमराहवर कामाचं प्रचंड दडपण आहे. त्यानं आतापर्यंत सहा डावांमध्ये ११७.४ षटकं फेकली आहेत. ट्वेंटी-20 मालिकेत त्याला विश्रांती दिली गेली होती. त्यानंतर सराव सामन्यात तो खेळला. तत्पूर्वी तो तीन वन डे सामने खेळला. आता दुखापतीमुळे त्याला चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे.
सरावात मयांक अग्रवाल जखमी स्पोर्ट्स टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार सराव करताना मयांक अग्रवाललाही दुखापत झाली आहे. दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या जागी चौथ्या कसोटीसाठी अग्रवालच्या नावाचा विचार सुरू आहे. पण, दुखापतीमुळे त्याच्याही खेळण्यावर अनिश्चितता आहे. मयांकच्या दुखापतीचं स्कॅन करण्यात आलं आणि त्याचा अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे.