India vs Australia, 2nd ODI : अॅरोन फिंच ( Aaron Finch ) आणि डेव्हिड वॉर्नर ( David Warner) या जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. १४२ धावांचा भक्कम पाया रचल्यानंतर दोन्ही सलामीवीर मागोमाग तंबूत परतले. पण, या भागीदारी दरम्यान एक प्रसंग असा घडला की ज्यानं सर्वांचे लक्ष वेधले. डावाच्या १२व्या षटकात नवदीप सैनीच्या फुल टॉसवर फिंचच्या पोटाला दुखापत झाली. ती पाहण्यासाठी लोकेश राहुलनं हात पुढे केला आणि त्याचवेळी फिंचनं त्याला मस्करीत ठोसा मारला.
पाहा व्हिडीओ... दरम्यान, वॉर्नर-फिंच जोडीनं पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. नवदीप सैनीला टार्गेट करताना वॉर्नरने काही सुरेख फटके मारले. जसप्रीत बुमराहचे अपयश ही खरी टीम इंडियाची डोकेदुखी आहे. वॉर्नरला धावबाद करण्याची संधी भारतीयांनी गमावली आणि त्यानंतर त्यांच्यावर ही नामुष्की ओढावली. वॉर्नर-फिंचनं सलग दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. मोहम्मद शमीनं टीम इंडियाला यश मिळवून दिलं. फिंच ६९ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६० धावा करून माघारी परतला. फिंच व वॉर्नर यांनी पहिल्या विकेटसाठी १४२ धावांचा भक्कम पाया रचला. त्यानंतर वॉर्नर ७७ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीनं ८३ धावा करून धावबाद होत माघारी परतला. लाँग ऑफवर असलेल्या श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) डायरेक्ट हिट करून वॉर्नरला बाद केले.
त्यानंतर स्टीव्हन स्मिथ व मार्नस लाबुसेन यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. पहिल्या वन डेत शतक करणाऱ्या स्मिथनं या सामन्यात अर्धशतक पूर्ण केले.