नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : इंग्लंड येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांनी तोडीसतोड कामगिरी केलेली आहे. पण, या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकेश राहुल आणि रिषभ पंत या दोन खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. दोघांना आतापर्यंत ठिकठाक कामगिरी करता आलेली आहे आणि बुधवारी होणारा पाचवा सामना ही त्यांच्यासाठी अखेरची संधी असणार आहे.
जवळपास दशकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ फिरोज शाह कोटलावर वन डे क्रिकेटमध्ये समोरासमोर येणार आहेत. ऑक्टोबर 2009 मध्ये उभय संघ शेवटचे या मैदानावर खेळले होते. फिरोज शाह कोटलावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चारपैकी तीन सामन्यांत यजमानांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जात आहे. पाचव्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन हेच सलामीला येणे अपेक्षित आहे. त्यामुळे राहुल तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी मैदानावर उतरू शकतो. कामगिरीशी झगडत असलेला अंबाती रायुडूला पुन्हा बाकावर बसावे लागू शकते आणि त्यामुळे विजय शंकर, केदार जाधव व रिषभ पंत यांच्याकडे मधल्या फळीची जबाबदारी असणार आहे.
पाचव्या वन डेसाठी असा असेल संघशिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, केदार जाधव, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह.