ब्रिस्बेन, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मासाठी यंदाचे वर्ष विशेष ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेतील निराशाजनक सुरुवातीनंतर 'हिटमॅन' रोहितने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुफान फटकेबाजी केली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहितने नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पेलली आणि त्याने भारताला निदाहास चषक, आशिया चषक आणि वेस्ट इंडिजविरुद्धची ट्वेंटी-20 मालिका जिंकून दिली. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि आज ट्वेंटी-20 सामन्यातून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेत रोहितची फटकेबाजी अनुभवण्यासाठी चाहते आतुर आहेत. या मालिकेत त्याला विक्रमही खुणावत आहेत.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहितची बॅट तुफान तळपते. त्याच्याकडून होणाऱ्या चौकार-षटकारांची आतषबाजीचा आनंद लुटण्याची संधी चाहत्यांना दवडायची नसते. ऑस्ट्रेलियातही क्रिकेट रसिकांना याच संधीची प्रतीक्षा आहे. आज होणाऱ्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात चार षटकार खेचताच रोहित एक विक्रम नावावर करेल. ट्वेंटी-20त रोहितने 96 षटकार खेचली आहेत आणि त्याला षटकारांचे शतक पूर्ण करण्याची संधी आहे. अशी कामगिरी केल्यास षटकांचे शतक करणारा तो पहिला भारतीय ठरेल.
याशिवाय 2018 या वर्षात ट्वेंटी-20त सर्वाधिक धावांचा विक्रमही तो नावावर करू शकतो. यंदाच्या वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा धवनच्या नावावर आहेत. धवनने 15 सामन्यांत 572 धावा केल्या आहेत आणि त्यात पाच अर्धशतकांचा समावेश आहे. रोहितने 560 धावा केल्या आहेत. एका कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-20 सर्वाधिक धावांचा विक्रम कर्णधार विराट कोहलीच्या (641) नावावर आहे. हा विक्रम मोडण्यासाठी रोहितला 81 धावा हव्या आहेत.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टील 2271 धावांसह आघाडीवर आहे. रोहितच्या नावावर 2207 धावा आहेत आणि त्याला गुप्टीलचा विक्रम मोडण्यासाठी 65 धावांची गरज आहे.