मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. मात्र ही मालिका सुरू होण्यास काही दिवस उरले असतानाच बीसीसीआयच्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. बीसीसीआयचं एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये सलामीवीर केएल राहुल हा बॉर्डर-गावसकर मालिकेमधून बाहेर झाला असल्याचे म्हटले आहे, बीसीसीआयचे हे ट्विट पाहून फॅन्सना धक्का बसला आहे. मात्र या व्हायरल ट्विटबाबत आता महत्त्वपूर्ण खुलासा झाला आहे,
बीसीसीआयचे हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर लोकेश राहुल हा बॉर्डर-गावस्कर मालिकेतून बाहेर पडला, असे फॅन्सना वाटले. मात्र प्रत्यक्षात सत्य काही औरच आहे. लोकेश राहुल पूर्णपणे फिट असून, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध आहे.
दरम्यान, लोकेश राहुलबाबत बीसीसीआयचं जे ट्विट व्हायरल होत आहे, ते खरं आहे. मात्र ते ट्विट ५ जानेवारी २०२१ मधील आहे. तेव्हा लोकेश राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला होता. ५ जानेवारी २०२१ रोजी बीसीसीआयने ट्विट करून ही माहिती दिली होती. तेच ट्विट नव्याने दाखवून लोकेश राहुलच्या खेळण्याबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. मात्र आता याबाबत स्पष्टता आल्याने संभ्रम दूर झाला आहे.