भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर - गावसकर कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतलेली आहे. मात्र संघाचा उपकर्णधार लोकेश राहुल यांचा खराब फॉर्म संघासाठी चिंतेची बाब ठरलेला आहे. या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी लवकरच संघांची घोषणा होणार आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघातून लोकेश राहुलचा पत्ता कट करून त्यांच्या जागी त्याचाच जवळचा मित्र असलेल्या धडाकेबाज फलंदाजाला संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
या फलंदाजाचं नाव आहे मयांक अग्रवाल.मयांक अग्रवालने रणजी करंडक स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने या हंगामात कर्नाटककडून ९ सामन्यांतील १३ डावांत ८२.५ च्या धडाकेबाज सरासरीने ९९० धावा पटकावल्या आहेत. त्यात तीन शतके आणि सहा अर्धशतकाच्या समावेश आहे. या हंगामात मयांक अग्रवालची सर्वोत्तम धावसंख्या ही २४९ होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या मजल मारली होती. या कामगिरीमुळे मयांक अग्रवाल याला शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघात स्थान मिळू शकते. तर लोकेश राहुलला डच्चू मिळू शकतो. नागपूर कसोटीत राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो केवळ २० धावा काढून बाद झाला होता.
मयांक अग्रवाल गेल्या ११ महिन्यांपासून भारतीय संघाबाहेर आहे. त्याने त्याचा शेवटचा कसोटी सामना गेल्यावर्षी मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून बाहेरची वाट दाखवण्यात आली होती. मात्र आता रणजी करंडक स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून मयांक ने पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे.