बंगळुरू, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भरपूर संधी मिळूनही धावांचा पडलेला दुष्काळ, कॉफी विथ करण या कार्यक्रमातील अश्लील वक्तव्य या साऱ्या गोष्टींमुळे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल निराशेच्या गर्तेत अडकला होता. पण यामधून त्याला भारताच्या एका महान फलंदाजाने बाहेर काढले. या महान फलंदाजाच्या टिप्समुळे राहुलच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेत धावा बरसल्या. या यशानंतर राहुलनेच आपल्याला एका दिग्गज खेळाडूने मार्गदर्शन केल्याचे म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात राहुलने अर्धशतक झळकावले होते. त्याच्या अर्धशतकामुळे भारताला 126 धावा करता आल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातही राहुलचे अर्धशतक फक्त तीन धावांन हुकले होते. या कामगिरीनंतर राहुल चांगल्या फॉर्ममध्ये आल्याचे म्हटले जात आहे. पण एका दिग्गज फलंदाजाने राहुलला मार्गदर्शन केल्यानंतर हा बदल पाहायला मिळाला आहे.
राहुल याबाबत म्हणाला की, " संघातून मला बाहेर काढण्यात आले होते. तेव्हा मी भारतीय 'अ' संघातून खेळत होतो. त्यावेळी राहुल द्रविड हे आमचे प्रशिक्षक होते. त्यांनी माझ्या फलंदाजीवर मेहनत घेतली. त्यांनी बऱ्याच गोष्टी मला समजवून सांगितल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी संघात परतलो आणि माझ्याकडून चांगल्या धावा होत आहेत."
भारताने मालिका गमावली
भारतीय संघाला दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभवाची चव चाखवत मालिका 2-0ने खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने 190 धावांचे लक्ष्य 7 विकेट आणि 2 चेंडू राखून पार केले. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद 113 धावांची तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत दोन्ही वेळा धावांचा यशस्वी पाठलाग केला. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला प्रथमच मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. कोहलीच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर भारतीय संघ कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट मालिकेत प्रथमच पराभूत झाला आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ घरच्या मैदानावर आतापर्यंत 16 मालिका खेळला आहे. त्यापैकी सात कसोटी, पाच वन डे आणि 3 ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघाला एकदाही हार मानावी लागली नाही. मागील 15 पैकी 14 मालिकांत कोहलीनं विजय मिळवला आहे, तर एक मालिका बरोबरीत सुटली. पण, 16व्या मालिकेत कोहलीला पराभव पत्करावा लागला. अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने 11 वर्षांत प्रथमच भारताला ट्वेंटी-20 मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला.
Web Title: India vs Australia: Lokesh Rahul's scored more runs after rahul dravid's tips
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.