नवी दिल्ली : सातत्याने अपयशी ठरणाऱ्या मधल्या फळीचे दुखणे कायम राहिल्याने यजमान भारताचा निर्णायक पाचव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५ धावांनी पराभव झाला. यासह ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-३ अशी गमावली. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारताने वर्चस्व मिळवले, मात्र ऑसीने भारताच्या कमकुवत बाजूंचा फायदा घेत टी२० मालिकेनंतर एकदिवसीय सामन्यांची मालिकाही जिंकली.
फिरोझशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑसी कर्णधार अॅरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाच्या मालिकेतील दुसऱ्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ९ बाद २७२ धावांची मजल मारली. यानंतर मधली फळी कोलमडल्याने भारताला ५० षटकात सर्वबाद २३७ धावाच काढता आल्या.
सलामीवीर रोहित शर्माचे अर्धशतक आणि केदार जाधव व भुवनेश्वर कुमार यांची झुंजार खेळी वगळता भारताचे इतर फलंदाज अपयशी ठरले. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा पल्ला पार करत ८९ चेंडूत ५ चौकारांसह ५६ धावांची संयमी खेळी केली. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर तो संघाला विजय मिळवून देईल असे दिसत होते. मात्र अॅडम झम्पाला पुढे सरसावत येऊन फटका मारण्याच्या नादात त्याच्या हातून बॅट हवेत फेकली गेली आणि यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीने त्याला यष्टीचीत केले. हाच टर्निंग पॉइंट ठरला. रोहित बाद झाला तेव्हा भारताची २८.२ षटकात ५ बद १३२ धावा अशी अवस्था झाली होती.
याच षटकात झम्पाने रवींद्र जडेजाला शून्यावर बाद केले. केदार-भुवनेश्वर यांनी सातव्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी करत भारताच्या आशा उंचावल्या. दोघेही पाठोपाठ बाद झाल्याने भारताचा पराभव स्पष्ट झाला. केदारने ५७ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ४४, तर भुवनेश्वरने ५४ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ४६ धावा केल्या. झम्पाने ४६ धावांत ३ बळी घेतले. पॅट कमिन्स व झाय रिचडर््सन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी ख्वाजाच्या जोरावर ऑसीने ९ बाद २७२ अशी मजल मारली. ख्वाजाने १०६ चेंडूत १० चौकार व २ षटकारांसह १०० धावा केल्या. ४३ चेंडूत २७ धावा करणाºया फिंचसह त्याने सलामीला ७६ व पीटर हँडस्कोम्बसह दुसºया गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली. हँडस्कोम्बने ६० चेंडूत ५२ धावा केल्या. अखेरच्या १० षटकात ऑसीने ७० धावा करताना ५ फलंदाज गमावले.
रोहित शर्माची विक्रमी कामगिरी...
‘हिटमॅन’ रोहित शर्माने संयमी अर्धशतक झळकावत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो नववा भारतीय, तर एकूण ३१वा फलंदाज ठरला. त्याने वैयक्तिक ४६वी धाव घेताच हा पल्ला गाठला. यासह त्याने सौरव गांगलीच्या सर्वात जलद २००व्या डावात ८ हजार धावा पूर्ण करण्याच्या विक्रमाशी बरोबरीही केली. सर्वात कमी डावांत हा पल्ला गाठण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (१७५) नावावर असून त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा (१८२) क्रमांक आहे. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दिन, युवराज सिंग आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ८ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
उस्मान ख्वाजाने या मालिकेत सर्वाधिक ३६६ धावांचा विक्रम नोंदविला. मालिकेत भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणाºया फलंदाजांच्या यादीत ख्वाजा अव्वल स्थानी राहिला. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (पाच सामन्यात ३६१ धावा) मागे टाकले. फिरोजशाह कोटलावर याआधी केवळ दोनदा २५० व त्याहून अधिक लक्ष्याचा पाठलाग करण्यात संघांना यश आले. १९९६ च्या विश्वचषकात श्रीलंकेने ही कामगिरी केली होती.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : ५० षटकात ९ बाद २७२ धावा (उस्मान ख्वाजा १००, पॉटर हँड्सकोम्ब ५२, झाय रिचडर््सन २९, अॅरॉन फिंच २७, मार्कस स्टोइनिस २०, एश्टन टर्नर २०; भुवनेश्वर कुमार ३/४८, रवींद्र जडेजा २/४५, मोहम्मद शमी २/५७, कुलदीप यादव १/७४). वि.वि. भारत : ५० षटकांत सर्वबाद २३७ धावा. (रोहित शर्मा ५६, भुवनेश्वर कुमार ४६, केदार जाधव ४४, विराट कोहली २०, ॠषभ पंत १६, विजय शंकर १६, शिखर धवन १२; अॅडम झम्पा ३/४६, मार्कस स्टोइनिस २/३१, पॅट कमिन्स २/३८, झाय रिचडर््सन २/४८, नॅथन लेयॉन १/३४.)
Web Title: India vs Australia: Middle class suffering pain; The hosts lost the series to India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.