मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याची तणावाची परिस्थिती लक्षात घेता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेतील चौथ्या सामन्याचे स्थळ बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) सुरक्षेच्या कारणास्तव मोहाली येथे होणारा हा सामना दुसरीकडे हवण्याच्या तयारीत आहे. 10 मार्च येथे पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर हा सामना होणार होता, परंतु हा सामना लखनौ किंवा राजकोट येथे खेळवण्यात येईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिका शनिवारपासून सुरू होत आहे. पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर ( 5 मार्च), रांची ( 8 मार्च), मोहाली ( 10 मार्च ) व दिल्ली ( 13 मार्च ) असे सामने होतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया मार्च व एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणार आहे.
भारताचे पारडे जडभारतीय संघाने जानेवारीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर वन डे मालिकेत 2-1 असे नमवले होते. ऑस्ट्रेलिया संघाची भारतातील वन डे मालिकेतील कामगिरी फार चांगली झालेली नाही. भारत दौऱ्यातील मागील तीन वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया 2017 मध्ये भारतात पाच वन डे सामन्यांची मालिका खेळला होता आणि त्यात यजमानांनी 4-1 अशी बाजी मारली होती. तत्पूर्वी, 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाला येथे वन डे मालिका गमवावी लागली आहे.
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मागील 8 वन डे सामन्यांत भारताने 6 विजय मिळवले आहेत. भारताने मागील दहा वन डे सामन्यांत आठ विजय मिळवले आहेत, तर ऑस्ट्रेलियाला मागील दहा सामन्यांत आठ पराभवांचा सामना करावा लागला आहे.
- ऑस्ट्रेलियाने 25 महिन्यांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2017 मध्ये पाकिस्तानला ( 4-1) नमवून अखेरची वन डे मालिका जिंकली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 29 वन डे सामन्यांत केवळ 8 विजय मिळवले आहेत आणि या कालावधीत त्यांनी सहा वन डे मालिका गमावल्या आहेत.
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 131 वन डे सामने झाले आहेत आणि त्यात भारताला केवळ 47 विजय मिळवता आले, तर ऑस्ट्रेलियाने 74 वेळा बाजी मारली. उभय संघांमध्ये 10 सामने अनिर्णीत राहिले.
- भारतीय भूमीत ऑस्ट्रेलियाने 56 वन डेपैकी 26 सामने जिंकले आहेत आणि भारताला 25 सामन्यांत विजय मिळवता आले आहेत. पाच सामने अनिर्णीत राहिले आहेत.
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वोत्तम धावांचा विक्रम भारताच्या नावावर आहे. त्यांनी 2013 मध्ये बंगळुरू येथे 6 बाद 383 धावा चोपल्या होत्या. त्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये केलेली 2 बाद 359 धावांची खेळी ही सर्वोत्तम आहे.