भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला अहमदाबादमध्ये सुरुवात झाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. ऑस्ट्रेलियाने इंदूरमध्ये विजय मिळवणाऱ्या संघात कुठलाही बदल केलेला नाही. तर भारताने आपल्या अंतिम संघात एक बदल केला असून, मोहम्मद सिराजला विश्रांती देत मोहम्मद शमीचा संघात समावेश केला आहे.
संपूर्ण मालिकेत चांगली गोलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजला संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजला संघातून वगळण्यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे. नाणेफेकीनंतर रोहित शर्माने सांगितले की, नाणेफेक जिंकली असती तर आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. काय करायचं आहे हे आम्हाला माहिती आहे. या सामन्यासाठी मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. तर मोहम्मद शमीने संघात पुनरागमन केलं आहे. काही काळी ब्रेक घेणं हे नेहमीच चांगलं असतं. आपण एक संघ म्हणून एकत्र येत खेळण्याची गरज आहे. तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करू शकतो. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये आम्ही जी खेळपट्टी पाहिली होती, ती चांगली खेळपट्टी नव्हती. आता इथे तरी पाच दिवस पूर्ण खेळ होईल, अशी मला आशा आहे.
दरम्यान, चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले असून, हा सामना पाहण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस हे उपस्थित आहे. दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.
भारताचा अंतिम संघरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि उमेश यादव
ऑस्ट्रेलियाचा अंतिम संघ ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्स्कॉम्ब, कॅमरुन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, मॅथ्यू कुन्हमेन, नाथन लियॉन.