विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी चाहते आता महेंद्रसिंग धोनीला दोषी ठरवू लागले आहेत. कारण धोनीने या सामन्यात संथ खेळ केला आणि त्यामुळेच भारताला धावांचा डोंगर उभारता आला नाही, असे चाहते म्हणत आहे. जगातील सर्वोत्तम फिनिशरचे या सामन्यात ताळमेळ जमत नव्हते. धोनी या सामन्यात 'गरबा' खेळत होता, असेही काही चाहत्यांनी म्हटले आहे.
धोनी जेव्हा फलंदाजीला मैदानात उतरला तेव्हा भारताची 10 षटकांत 3 बाद 80 अशी स्थिती होती. उर्वरीत 10 षटकांमध्ये भारताने 80 धावा जरी केल्या असत्या तरी भारताला 180 धावा करता आल्या असत्या. पण अखेरच्या 10 षटकांमध्ये भारताला फक्त 46 धावाच करता आल्या. हेच पराभवाचे कारण ठरले आणि धोनीला त्यासाठीच क्रिकेट चाहते ट्रोल करताना दिसत आहेत.
या सामन्यात धोनीला स्थिरस्थावर झाल्यावरही मोठे फटके मारता आले नाहीत, असेही या सामन्यात निदर्शनास आले आहे. या सामन्यातील 19वे षटक पॅट कमिन्स टाकत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कोणत्याही फलंदाजाला मोठा फटका मारता आला असता. धोनीदेखील या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा विचार करत होता. धोनीने जर हा चेंडू व्यवस्थित फटकावला असता तर तो मिड विकेटला गेला असता. पण या चेंडूवर धोनी फसला. त्याला मोठा फटा मारता आला नाही. चेंडूने बॅटची कड घेतली. त्यावेळी हा चेंडू स्क्वेअर लेगला गेला. 19व्या षटकापर्यंत धोनी खेळपट्टीवर स्थिरस्थावर झाला होता, पण त्यानंतरही त्याला मोटा फटका मारता आला नाही.
महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात 37 चेंडूंमध्ये प्रत्येकी एक चौकार आणि षटकारासह 29 धावा केल्या. या सामन्यात लोकेश राहुलने अर्धशतक झळकावले आणि तेदेखील 36 चेंडूंमध्ये. धोनी राहुलपेक्षा एक चेंडू जास्त खेळला, पण तरीही त्याला शंभरच्या स्ट्राइक रेटने धावा करण्यात अपयश आले. या सामन्यात धोनीच्या नावावर हा एक नकोसा विक्रम झाला आहे.