अॅडलेड, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अॅडलेड वन डे सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला. कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करून भारताच्या विजयाचा पाया रचला आणि धोनीनं त्यावर कळस चढवला. ऑस्ट्रेलियाने ठेवलेले 299 धावांचे लक्ष्य भारताने 6 विकेट आणि चार चेंडू राखून पूर्ण केले. या विजयाबरोबर भारताने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. मात्र, या सामन्यात धोनीकडून एक चूक झाली आणि ती कदाचित भारताला महागात पडली असती. धोनीच्या चूकीचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यानंतर धोनी मॅच फिनिशर म्हणून तर चर्चेत राहिलाच, परंतु त्याच्या चुकीवरही चर्चा रंगल्या. व्हायरल झालेल्या व्हिडीओत धोनीनं एक धाव पूर्ण केली नसल्याचे दिसून येत आहे. त्याच्या या शॉर्टरनवर पंचांचीही नजर गेली नाही. 45व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर धोनी धाव घेण्यासाठी धावला, परंतु दुसऱ्या बाजूला बॅट न टेकवताच तो माघारी फिरला.
पंचांना ही गोष्ट दिसली नाही आणि त्यांनी ती धाव अवैध ठरवली नाही. मात्र, सोशल मीडियावर तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. धोनीने या सामन्यात 54 चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 55 धावा केल्या. कोहलीने 112 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 104 धावा चोपल्या.