विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चारल्यानंतर भारतीय संघ कांगारूंचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धा लक्षात घेता भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतून वर्ल्ड कपसाठीच्या संघाची चाचपणी केली जाणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ जवळपास निश्चित असला तरी काही जागांसाठी संघात चुरस आहे. त्यात रिषभ पंतला संधी मिळावी अशी मागणी करणारेही भरपूर आहेत. वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात रिषभला संधी मिळावी, अशी अपेक्षा भारताचे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केली आहे. या सामन्यात कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला खेळवण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.ESPN Cricinfo ला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकर म्हणाले,''आगामी वर्ल्ड कप स्पर्धेतील संघात धोनीचं स्थान पक्के आहे. त्यामुळे त्याच्या जागी रिषभला अधिकाधिक संधी देण्याची गरज आहे.'' मांजरेकर यांनी पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यासाठी निवडलेल्या संघात मुंबई इंडियन्सच्या मयांक मार्कंडेलाही संधी दिली आहे. कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना पर्यायी फिरकीपटू म्हणून वर्ल्ड कप संघात मयांकचा विचार केला जावा, असा पर्याय त्यांनी सुचवला आहे.मांजरेकरांच्या संघातून आणखी एका खेळाडूला वगळण्यात आले आहे. 53 वर्षीय मांजरेकर यांनी लोकेश राहुललाही वगळले आहे. ते म्हणाले,''राहुलपेक्षा रिषभला संधी द्यायला हवी.'' इंग्लंड व ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राहुलला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. घरच्या प्रेक्षकांसमोर वेस्ट इंडीजविरुद्धही तो अपयशी ठरला होता. मांजरेकर यांनी कर्णधार विराट कोहली याच्या मताशीही सहमती दर्शवली आहे. वर्ल्ड कप सरावासाठी ट्वेंटी-20 पेक्षा अधिक वन डे सामन्यांचे आयोजन करण्याची आवश्यकता होती, असे मत कोहलीनं व्यक्त केलं होतं. मांजरेकर यांनीही ट्वेंटी-20 ही वर्ल्ड कप सरावासाठी पर्याय असू शकत नाही असे मत मांडले.माजरेकरांचा संघ : शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, विजय शंकर/कृणाल पांड्या, मयांक मार्कंडे, युजवेंद्र चहल, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, जस्प्रीत बुमराह.