भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली दुसरी कसोटी लढत २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणार आहे. पण, तिसऱ्या कसोटीवर अनिश्चिततेचं सावट आहे. सिडनीत कोरोनाची लाट आल्यामुळे ७ जानेवारीपासून सुरू होणारी तिसरी कसोटी दुसरीकडे हलवण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलिया करत आहे. ही कसोटी मेलबर्न येथेच खेळवण्यात येईल, असा दावा केला जात आहे. पण, टीम इंडियाची चिंता वाढवणारी गोष्ट अशी की, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा ( Rohit Sharma) सध्या सिडनीतच आहे आणि BCCIनं त्याबाबत अपडेट्स दिले आहेत.
भारतीय संघ आज मेलबर्न येथे दाखल झाला आहे आणि त्यांना तिसरी कसोटी दुसरीकडे हलवण्यात येईल, याची कल्पना देण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. ''सद्यस्थितीत मेलबर्न हाच सुरक्षित पर्याय असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाटते. खेळाडू व स्टाफ सदस्यांची सुरक्षितता हेच महत्त्वाचे आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया सातत्यानं BCCIच्या संपर्कात आहे आणि तिसऱ्या कसोटीचे स्थळ लवकरच ठरवण्यात येईल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं The New Indian Express ला सांगितले.
यापूर्वी न्यू साऊथ वेल्समध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं जलदगती गोलंदाज सीन अॅबोट व फलंदाज डेव्हिड वॉर्नर यांना सिडनी येथून शनिवारीच एअरलिफ्ट केलं. ही दोघं दुखापतीमुळे अॅडलेड कसोटी खेळू शकली नव्हती आणि मेलबर्न कसोटीसाठी दोघंही संघासोबत आहेत. तिसऱ्या कसोटीसाठी सिडनी सुरक्षित नसल्याचे BCCI आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाटते. त्यामुळे ही कसोटी दुसरीकडे हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सिडनीत आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आणि तंदुरुस्त होऊन १६ डिसेंबरला ऑस्ट्रेलियात पोहोचला. त्यानंतर तो सिडनीत आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण, बीसीसीआयनं सांगितले की,''रोहित शर्मा सिडनीत सुरक्षित आहे. तो बायो सुरक्षित वातावरणात आहे आणि सध्या १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत आहे. संघ व्यवस्थापन त्याच्या संपर्कात आहेत. तेथील परिस्थिती बिघडल्यास, BCCI रोहितला तेथून बाहेर काढण्यास प्रयत्न करणार.''