मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंग धोनीने आपल्या टीकाकारांना बॅटने चोख उत्तर दिले. या सामन्यात धोनीमधला मॅच फिनिशर पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पण दिनेश कार्तिकला मात्र ही गोष्ट मान्य नसावी. कारण मी मॅच फिनिशर आहे, असे विधान करत त्याने वादाला तोंड फोडले आहे.
क्रिकेट विश्वामध्ये सर्वोत्तम मॅच फिनिशर म्हणून धोनीची ओळख आहे. धोनीने आतापर्यंत बऱ्याच सामन्यांमध्ये भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. काही सामने तर एकट्याच्या जीवावर जिंकवूनही दिले आहे. 2011 साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही धोनीने षटकार खेचत भारताला जेतेपद मिळवून दिले होते.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहली बाद झाल्यावर धोनीने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. शेवटपर्यंत खेळपट्टीवर धोनी उभा राहिला आणि संघाच्या विजयावर शिक्कोमोर्तब केले होते. यावेळी धोनीला कार्तिकची चांगली साथही मिळाली होती. धोनी-कार्तिक जोडीने अभेद्य भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला होता.
सामन्यानंतर एका मुलाखतीमध्ये कार्तिक म्हणाला की, " धोनीच्या मनात नेमके काय चालू असते, याचा थांग कुणालाही लागू शकत नाही. प्रत्येक परिस्थिती तो उत्तमपणे हाताळतो. संघाने आता माझ्यावर विशेष जबाबदारी सोपवली आहे. संघ व्यवस्थापनाने मला मॅच फिनिशर म्हणून निवडले आहे. त्यामुळे माझ्या फलंदाजीच्या स्थानामध्येही बदल करण्यात आला आहे. मी या गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. "
पाहा हा खास व्हिडीओ