मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : नव वर्षातील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पण भारतावर १० विकेट्सने पराभव पत्करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
भारताला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार धक्का दिला. वानखेडेवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच भारताच्य गोलंदाजांना धूळ चारत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताचे २५६ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता सहजपणे पूर्ण केले.
भारताला पहिल्यांदा दहा विकेट्ने पराभूत होण्याची वेळ १९८१ साली आली होती. त्यावेळी न्यूझीलंडच्या संघाने भारताला या मोठ्या फरकाने पराभूत केले होते. भारताने न्यूझीलंडपुढे ११३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने एकही फलंदाज गमावला नव्हता.
वेस्ट इंडिजने १९९७ साली बर्मिंगहम येथे भारतावर मोठा विजय मिळवला होता. भारताने वेस्ट इंडिजपुढे २०० धावांचे आव्हान ठेवले होते. वेस्ट इंडिजने एकही फलंदाज न गमावता हे आव्हान पार केले होते. त्यानंतर २००० साली शारजाह येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या लढतीतही हीच गोष्ट पाहायला मिळाली होती. भारताने आफ्रिकेपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळीही भारतावर दहा विकेट्स राखून विजय मिळवला गेला. आफ्रिकेने यानंतर कोलकाता येथे २००५ साली भारतावर दहा विकेट्स राखून विजय मिळवला होता. यावेळी भारताने त्यांचापुढे १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर आज झालेल्या सामन्यात मानहानीकारक पराभव भारताच्या पदरी पडला.
भारताविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले आहे. वॉर्नरने या सामन्यात एक पराक्रम करत देशाला विजय मिळवून देण्याता मोलाचा वाटा उचलला आहे.
डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. या दोघांनी या सामन्यात विश्वविक्रम रचला आणि संघाला विजयही मिळवून दिला. वॉर्नर आणि फिंच या जोडीने भारताविरुद्ध अभेद्य २५८ धावांची भागीदारी रचली. आतापर्यंत वानखेडेवर भारताविरुद्ध झालेली ही सर्वाधिक भागीदारी आहे.
वॉर्नरने यावेळी चौकारासह आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील १८वे शतक ठरले. हे शतक साजरे करतना वॉर्नरने इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात जलद पाच हजार धावा करण्याचा पराक्रम वॉर्नरने केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांच्या नावावर होता.