मुंबई : भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. 289 धावांचा पाठलाग करताना भारताला 254 धावांपर्यंत मजल मारता आली. या पराभवामागे आघाडीच्या फलंदाजांचे अपयश हे एक कारण आहे. अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या धावांवर अंकुश राखाण्यात आलेले अपयश भारताला महागात पडले. त्यामुळे चाहत्यांना एका गोलंदाजाची उणीव जाणवली आणि त्यांनी सोशल मीडियावरून त्याला ऑस्ट्रेलियात परतण्याची साद घातली.
ऑस्ट्रेलियाच्या धावांवर चाप बसवण्यात भारतीय संघाला सुरुवातीला यश आले होते आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया जेमतेम 250 धावांपर्यंत मजल मारु शकेल असे वाटले होते. मात्र मार्कस स्टोइनिसने दमदार फटकेबाजी करताना ग्लेन मॅक्सवेलसह अखेरच्या पाच षटकांत 50 धावा चोपल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 5 बाद 288 धावांचा डोंगर उभा करता आला. उस्मान ख्वाजा (59), शॉन मार्श (54) आणि पीटर हँड्सकोम्ब (73) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या वन डे भारतासमोर 289 धावांचे आव्हान ठेवले आहे. मार्कस स्टोइनिसने ( नाबाद 47) अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना ऑस्ट्रेलियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला.
ऑस्ट्रेलियाने चोपलेल्या त्या अतिरिक्त धावाच भारतीय संघाला महागात पडल्या. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या अनुभवी गोलंदाजांना अखेरच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या धावा रोखता आल्या नाही. त्यामुळे चाहत्यांनी बुमराला साद घातली आहे. आगामी आयपीएल आणि वर्ल्ड कप स्पर्धांसाठी बुमराला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार नाही. कसोटी मालिकेत सर्वाधिक 21 विकेट घेणाऱ्या बुमराला विश्रांती देण्याचा हा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही. त्यात पहिल्या सामन्याच्या पराभवामुळे ते आणखी भडकले आहेत.