सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरी आणि कसोटी मालिकेतील शरणागतीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वन डे मालिकेत इभ्रत वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असूनही ऑस्ट्रेलियाला साजेशी कामगिरी करता आली नाही. कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर त्यांना प्रथमच भारताकडून हार पत्करावी लागली. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑसींच्या एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही. या नाचक्कीनंतर वन डे मालिकेत चांगली कामगिरी करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत नशीब पालटण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ Retro जर्सी परिधान करून मैदानावर उतरणार आहे.
भारतीय संघ 1947 पासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे आणि 11 कसोटी मालिकेत भारताला एकदाही विजय मिळवता आला नव्हता. मात्र, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला आणि 2-1 अशी फरकाने मालिका खिशात घातली. त्यानंतर ऑसी संघावर सडकून टीका झाली. त्यांच्या संघ निवड प्रक्रियेवरही बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यामुळे वन डे मालिकेत चांगली कामगिरी करण्याचे दडपण त्यांच्यावर आहे.
पण, या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ Retro लूक मध्ये दिसणार आहे. 1986च्या वन डे मालिकेत अॅलन बॉर्डर यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑसी संघाने याच Retro लूक जर्सीत भारताला 5-2 असे नमवले होते. त्यामुळे हा लुक आताही त्यांना तारेल असा समज ऑसी संघाचा झाला असावा. गडद पिवळा रंग आणि त्यावर आडवी हिरवी पट्टी व हिरवी कॉलर अशा प्रकारची जर्सी घालून ऑस्ट्रेलियाचा संघ वन डे मालिकेत खेळणार आहे.