ठळक मुद्देविराट कोहलीनं शतकी खेळी साकारून रचलेल्या पायावर अष्टपैलू विजय शंकरनं विजयाचा कळस चढवला.विजय शंकरला ४६वी ओव्हर टाकायला द्यायची, असा विचार विराट कोहलीनं केला होता.अटीतटीच्या वेळी निर्णय घेण्यात माही माहीर असल्याचं कितीतरी वेळा सिद्ध झालंय.
नागपूर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी साकारून रचलेल्या पायावर अष्टपैलू विजय शंकरनं विजयाचा कळस चढवला. शेवटच्या षटकात कांगारूंना ११ धावांची गरज असताना, शंकरनं तीन चेंडूत दोन विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा 'खेळ खल्लास' केला आणि भारतानं मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या विजयाबद्दल 'कॅप्टन कोहली'चं कौतुक होत असलं, तरी शेवटच्या पाच षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माचा सल्ला मोलाचा ठरल्याचं स्वतः विराटनंच प्रांजळपणे सांगितलंय.
भारतानं दिलेल्या २५१ धावांच्या आव्हानाकडे ऑस्ट्रेलियाची वाटचाल सुरू होती. त्यांचं पारडं जरा जडच वाटत होतं. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा होता. अशा वेळी, विजय शंकरला ४६वी ओव्हर टाकायला द्यायची, असा विचार विराट कोहलीनं केला होता. म्हणजे, जसप्रित बुमराहला शेवटची ओव्हर देता येईल, असं त्याचं मत होतं. परंतु, ४६ वी ओव्हर बुमराहलाच देण्याची सूचना धोनी आणि रोहितनं केली. शंकरनं त्याच्या आधीच्या षटकात १३ धावा दिल्या होत्या. त्याला ४६ वी ओव्हर दिली आणि त्यातही जास्त धावा निघाल्या, तर भारतावरचा दबाव वाढेल, हे त्यामागचं गणित होतं. ते विराटला पटलं. त्यानं बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याच ओव्हरमध्ये सामना फिरला.
बुमराहने दुसऱ्या चेंडूवर नॅथन कुल्टर नाइलला (४ धावा) बाद केलं आणि चौथ्या चेंडूवर पॅट कमिन्सला (०) तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे कांगारूंची अवस्था ८ बाद २२३ अशी झाली. स्वाभाविकच, त्यांचा आत्मविश्वास डळमळला. मार्कस स्टॉइनिसनं एक बाजू लावून धरली होती, पण धावांचा वेग त्याला वाढवता आला नाही. त्याची परिणती कांगारूंच्या पराभवात झाली.
अर्थात, विजय शंकरनं शेवटच्या ओव्हरमध्ये जी चलाखी दाखवली, ती भारीच होती. पण, ४६ वी ओव्हर त्याला न देण्याचा निर्णयही तितकाच निर्णायक ठरला. त्याचं श्रेय स्वतः विराटनंच धोनी-रोहितला दिलंय. अटीतटीच्या वेळी निर्णय घेण्यात माही माहीर असल्याचं कितीतरी वेळा सिद्ध झालंय. पण, रोहितही उपकर्णधार म्हणून महत्त्वाच्या, उपयुक्त सूचना करतो, असंही विराटनं सांगितलं. त्यांची ही 'युती' अशीच टिकून राहो आणि टीम इंडिया 'आघाडी'वर राहो, हीच सदिच्छा!
Web Title: India vs. Australia ODI: Dhoni and Rohit's game changer advice to Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.