सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला कसोटी मालिकेतील विजयी धडाका वन डे मालिकेत कायम राखण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने पहिल्याच सामन्यात भारतावर 34 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मात्र या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माची खेळी लक्षवेधी ठरली. पहिल्या सामन्यात हार झाली असली तरी भारतीय संघाला मालिकेत कमबॅक करण्याचा विश्वास आहे. त्यामुळेच पराभवाचे दडपण न घेता सामन्यानंतर रोहितने 'floss' डान्स शिकण्याचा प्रयत्न केला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 289 धावांचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज 4 धावांवर माघारी परतले. रोहित शर्मा ( 133) आणि महेंद्रसिंग धोनी ( 51) यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र, धावा आणि चेंडू यांच्यातील फरक इतके वाढले की भारताचा विजय दूरावला. मात्र, रोहित खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीयांना विजयाच्या आशा होत्या. 46व्या षटकांत तो माघारी परतला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी सामना जिंकला. भारताला 50 षटकांत 9 बाद 254 धावा करता आल्या.
रोहितने या शतकी खेळीबरोबरच अनेक विक्रमांना गवसणी घातली. ऑस्ट्रेलियात पाच वन डे शतक करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. याशिवाय ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार शतक करणाराही तो पहिलाच फलंदाज... असे अनेक विक्रम त्याने पहिल्या सामन्यात नोंदवले. त्यामुळे या शतकी खेळीचे सेलिब्रेशन तर करायलाच हवं. म्हणून रोहितने 'floss' डान्स ट्राय केला. पाहा व्हिडीओ...