हैदराबाद, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर भारताचा वर्ल्ड कप साठीचा संघ निवडण्यात येणार आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा संघही या मालिकेतून वर्ल्ड कप तयारी करणार आहे. त्यामुळे ही मालिका भारत-ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने निर्भेळ यश मिळवले असले तरी वन डेत त्यांना विराट कोहली व कंपनी तोडीसतोड उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. उभय संघांमधील पहिला वन डे सामना शनिवारी होणार आहे.
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 131 वन डे सामने झाले आहेत आणि त्यात भारताला केवळ 47 विजय मिळवता आले, तर ऑस्ट्रेलियाने 74 वेळा बाजी मारली. उभय संघांमध्ये 10 सामने अनिर्णीत राहिले.
- भारतीय भूमीत ऑस्ट्रेलियाने 56 वन डेपैकी 26 सामने जिंकले आहेत आणि भारताला 25 सामन्यांत विजय मिळवता आले आहेत. पाच सामने अनिर्णीत राहिले आहेत.
- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्वोत्तम धावांचा विक्रम भारताच्या नावावर आहे. त्यांनी 2013 मध्ये बंगळुरू येथे 6 बाद 383 धावा चोपल्या होत्या. त्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये केलेली 2 बाद 359 धावांची खेळी ही सर्वोत्तम आहे.