नागपूर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीच्या डोक्यात कधी काय चालेल, हे सांगता येत नाही. तो एक अवलिया आहे. तो स्वत: नेमकं काय करतो, हे कोणालाही कळत नाही. दुसरीकडे समोरचा खेळाडू काय करणार आहे, हे तो उत्तमपणे जाणतो. या गोष्टीचा प्रत्यय ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आला.
भारताच्या 251 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 242 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आठ धावांनी विजय मिळवता आला. अखेरच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. पण विजय शंकरने या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टॉइनिसचा अडसर दूर केला. तो बाद झाल्यावर दुसऱ्या चेंडूवर दोन धावा ऑस्ट्रेलियाने काढल्या. पण तिसऱ्या चेंडूवर शंकरने अॅडम झाम्पाला त्रिफळाचीत करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात धोनीने अशी एक गोष्ट केली, सर्व चकित झाले. ही गोष्ट घडली ती 33व्या षटकात. केदार जाधव हा 33वे षटक टाकत होता. चेंडू कसा टाकायचा हे सल्ले तो केदारला देत होता. केदारने एक चेंडू लेग स्टम्पच्या बाहेर टाकला. त्यावेळी फलंदाज नेमका कोणता फटका मारणार, हे धोनीला कळून चुकले होते. धोनी ऑफ स्टम्पच्या बाहेर उभा होता. फलंदाज आता पॅडल स्विप मारणार, हे धोनीला समजले. चपळ धोनी तिथून थेट लेग स्लिपच्या जागेपर्यंत पोहोचला. फलंदाजही पॅडल स्विप खेळला. लेग स्लिपला गेलेल्या धोनीच्या ग्लोव्ह्जला यावेळी चेंडू लागला. जर हा झेल पकडला गेला असता तर तो आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल ठरला असता. धोनीची ही गोष्ट पाहिल्यावर कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवही चकित झाले.
हा पाहा स्पेशल व्हिडीओ
धोनी-रोहितचा 'तो' सल्ला विराटनं ऐकला अन् भारत जिंकला!ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं शतकी खेळी साकारून रचलेल्या पायावर अष्टपैलू विजय शंकरनं विजयाचा कळस चढवला. शेवटच्या षटकात कांगारूंना ११ धावांची गरज असताना, शंकरनं तीन चेंडूत दोन विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाचा 'खेळ खल्लास' केला आणि भारतानं मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या विजयाबद्दल 'कॅप्टन कोहली'चं कौतुक होत असलं, तरी शेवटच्या पाच षटकांमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माचा सल्ला मोलाचा ठरल्याचं स्वतः विराटनंच प्रांजळपणे सांगितलंय.
भारतानं दिलेल्या २५१ धावांच्या आव्हानाकडे ऑस्ट्रेलियाची वाटचाल सुरू होती. त्यांचं पारडं जरा जडच वाटत होतं. प्रत्येक चेंडू महत्त्वाचा होता. अशा वेळी, विजय शंकरला ४६वी ओव्हर टाकायला द्यायची, असा विचार विराट कोहलीनं केला होता. म्हणजे, जसप्रित बुमराहला शेवटची ओव्हर देता येईल, असं त्याचं मत होतं. परंतु, ४६ वी ओव्हर बुमराहलाच देण्याची सूचना धोनी आणि रोहितनं केली. शंकरनं त्याच्या आधीच्या षटकात १३ धावा दिल्या होत्या. त्याला ४६ वी ओव्हर दिली आणि त्यातही जास्त धावा निघाल्या, तर भारतावरचा दबाव वाढेल, हे त्यामागचं गणित होतं. ते विराटला पटलं. त्यानं बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याच ओव्हरमध्ये सामना फिरला.