मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : कसोटी मालिकेतील ऐतिहासिक मालिका विजयानंतर भारतीय संघाला वन डे मालिका विजय खुणावत आहे. दुसऱ्या वन डेत भारतीय संघाने विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे मेलबर्नवर होणाऱ्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा विक्रम भारताला खुणावत आहे. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला एक विक्रम खुणावत आहे. या सामन्यात दहा धावा करताच तो महान खेळाडू कपिल देव व सचिन तेंडुलकर यांच्या पंगतीत जाऊन बसू शकतो.
मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात दहा किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्यास त्याच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण होतील. वन डे क्रिकेटमध्ये 2000 धावा व 150 विकेट घेणारा तो एकूण 26 वा अष्टपैलू खेळाडू ठरणार आहे, तर भारताचा तिसरा खेळाडू ठरणार आहे. याआधी कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांनी अशी कामगिरी केली आहे. कपिल देव यांनी 225 वन डे सामन्यांत 3783 धावा आणि 253 विकेट घेतल्या आहेत. तेंडुलकरने 463 सामन्यांत 18426 धावा आणि 154 विकेट घेतल्या आहेत. जडेजाने 146 सामन्यांत 1990 धावा केल्या असून 171 विकेट घेतल्या आहेत.
दुसऱ्या वन डे सामन्यात कर्णधार कोहलीने वन डे कारकिर्दीतील 39वे शतक झळकावले आणि भारताला सहा विकेट राखून विजय मिळवून दिला. त्याला महेंद्रसिंग धोनीने नाबाद 55 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना शुक्रवारी होणार आहे.